भगवंतांचे आपल्यावर पुत्रवत प्रेम आहे
भगवंत अर्जुनाला म्हणाले, स्थिर मनाने योगाभ्यास केल्यावर मनाला उत्तम शांती मिळते. ह्या अध्यायात ते स्थिर कसे करायचे हा मुद्दा भगवंतांनी केंद्रस्थानी ठेवला आहे. माणसाच्या इच्छा संपल्या की, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांतून त्याचे मन मुक्त होऊन आत्मस्वरूपाजवळ आले की, त्यातून मिळणाऱ्या सुखाची बरोबरी जगातले इतर कोणतेही सुख करू शकत नाही हे अनुभवाने त्याला समजते. त्यामुळे ते आत्मस्वरूपाशी इतके एकरूप होते की, ते स्वत: आत्मरूप बनून जाते. असे झाले की, त्रैलोक्य त्या ऐक्याच्या तेजाने प्रकाशित झाल्याची अनुभूती त्याला येत राहते. या प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी दोषविरहित होतो व सुखाने ब्रह्मसाक्षात्काररूपी आत्यंतिक सुख भोगतो.
दुसऱ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे ही ब्राह्मीस्थिती असल्याने ती एकदा मिळवली की योगी त्यापासून कधीही चळत नाही आणि आयुष्याच्या शेवटी त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होते. असं जरी असलं तरी माणसाला हे सहजी पटत नाही म्हणून तो आयुष्यभर वस्तुत: मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखांच्या मागे लागलेला असतो. ते मिळवण्याचा संकल्प करतो. ते पूर्ण होण्यासाठी राबराब राबतो पण ते पूर्ण होणं न होणं हे ईश्वराच्या मर्जीवर अवलंबून असतं कारण ते पूर्ण होणं आपल्या हिताचे असेल तरच ईश्वर ते पूर्ण होऊ देतो पण मनुष्य हे लक्षात घेत नसल्याने त्याने केलेले संकल्प पूर्ण झाले नाहीत तर निराश होऊन दु:खीकष्टी होतो. माणसाला आपण कायम सुखी असावे असे वाटत असते म्हणून तो एकसारखा त्यासाठी धडपडत असतो.
अशा खडतर मार्गाने जाऊन सुख मिळवण्याची खटपट करण्यापेक्षा पुष्कळांनी या सोप्या आणि खात्रीने कायम टिकणारे सुख मिळवून देणाऱ्या योगमार्गाचा अनुभव घेतला आहे. खरं तर हा योगमार्ग अवघड आहे असं सगळे संत सांगतात पण भगवंत हा योगमार्ग सोपा आहे असं म्हणतात कारण त्यावेळी ते प्रपंचातून सुख मिळवण्यासाठी मनुष्य करत असलेल्या खटपटीशी योगमार्ग यशस्वी करण्यासाठी करावयाच्या खटपटीची तुलना करत असतात. ह्या तुलनेत योगमार्ग साधण्यासाठी करावी लागणारी खटपट खूपच कमी असते.
भगवंत ह्या योगमार्गाला जरी सोपं म्हणत असले तरी प्रपंचाच्या आसक्तीत बुडलेल्या सामान्य माणसाला तो बिलकुल सोपा वाटणार नाही ह्याची त्यांना पुरेपूर खात्री आहे परंतु माणसांवर त्यांचे पुत्रवत प्रेम असल्याने त्याने भरकटत न जाता योग्य मार्गाने पुढे जावे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वत:चा उद्धार करून घेऊन जीवनाचे सार्थक करावे अशी त्यांची कळकळीची इच्छा असल्याने ते अर्जुनाला म्हणाले, योगमार्ग म्हणजे आपल्या पायानी आपल्या पाठीवर चालण्यासारखे आहे म्हणून तुला जर त्याचे आचरण करणे शक्य नसेल तर ब्रह्मस्वरूप होण्याचा दुसरा मार्ग सांगतो ऐक. असं म्हणून पुढील श्लोकात भगवंत दुसऱ्या मार्गाबद्दल सांगताना म्हणाले, जो मी सर्व प्राणिमात्रांचे ठिकाणी आहे व माझ्या ठिकाणी प्राणिमात्र आहेत असे पाहतो. तो योगयुक्त होतो.
क्ऱमश: