इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यापेक्षा ईश्वर श्रेष्ठ आहे
अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, भडकलेल्या अग्निसारखी दाहकता असलेलं इच्छाचक्र आयुष्यभर माणसाच्यामागे लागलेलं असतं आणि मनुष्य त्याची दाहकता सोसत जगत असतो. त्यात मनुष्य शिकलेला असेल तर बघायलाच नको. कारण त्याला शिक्षणामुळे अहंकाराची जोड लाभलेली असते. मला सगळं कळतंय ह्या भ्रमामुळे तो या दाहकतेचा जास्त अनुभव घेतो. ही दाहकता जर अनुभवायची नसेल तर मनासह इंद्रियांचे नियमन करून त्यांना जिंकावे. आपलं स्वरूप ओळखून त्याच्यात विलीन होऊन जायचं आहे हे विसरून समोर दिसणाऱ्या नाशवंत गोष्टींच्या मागे लागून आपण अमुल्य अशा मनुष्य जन्मातील वेळ वाया घालवतो. इच्छा होणं हा मनुष्यस्वभाव आहे. इच्छित वस्तू सचोटीनं मिळवण्याचा प्रयत्न करावा. मिळाल्या तर ठीक आणि न मिळाल्या तर देवाची तशीच इच्छा होती असं समजून स्वस्थ रहावं हा राजमार्ग आहे. या गोष्टीचं सतत ध्यान असावं. म्हणजे इच्छा चक्राची दाहकता अनुभवाला येणार नाही. असं केलं तर मनाला आपोआपच लगाम बसेल. इंद्रिये नेहमी मनाच्या ताब्यात असतात. उदाहरणार्थ मनाची इच्छा नसेल तर कितीही आकर्षक गोष्टी पुढं मांडल्या तरी मनाला त्यांची भुरळ पडत नाही. म्हणजेच मन ताब्यात आलं की, इंद्रिये आपोआप ताब्यात येतात हे लक्षात ठेवावं.
तूम्ही अमुक एक गोष्ट पाहू नका असं डोळ्यांना दटावलं तर डोळे नेमकी तीच गोष्ट पाहून मनाला माहिती देतात. त्याउलट मनानं जर ठरवलं की, त्या गोष्टीकडे पहायचंच नाही तर डोळ्यांचा काहीही इलाज चालत नाही म्हणून मनाला समजावणं फार महत्त्वाचं आहे. वस्तू नुसती पाहून ती हवीच असे न ठरवता तिची योग्यायोग्यता तपासून पहावी व ती जर अयोग्य असेल तर मनाची समजूत घालावी व त्याकडे दुर्लक्ष करावे म्हणजे सर्वनाश होण्याचे टळेल. महाराष्ट्र एसटीच्या मागं मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक असं लिहिलेलं असतं ते वचन इथं तंतोतंत लागू पडतं. म्हणून माणसानं मनाची समजावणी करून हातून घडू पाहणारी पापकर्मे टाळावीत आणि पुढील सर्वनाश टाळावा. बाप्पा पुढील श्लोकात आणखीन समजावून सांगत आहेत.
यतस्तानि पराण्याहुस्तेभ्यश्च परमं मन ।
ततो पि हि परा बुद्धिरात्मा बुद्धे परो मत ।। 42।।
अर्थ- इंद्रिये देहाहून श्रेष्ठ आहेत, मन त्यांहून श्रेष्ठ आहे, बुद्धि मनाहून श्रेष्ठ आहे व आत्मा बुद्धीहून श्रेष्ठ आहे असे ज्ञात्यांचे मत आहे.
विवरण-याच अर्थाचा श्लोक गीतेच्या तिसऱ्या अध्यायातही आलेला आहे तो असा, इंद्रिये बोलिली थोर मन त्याहूनि थोर ते । बुद्धि थोर मनाहूनि थोर तीहूनि तो प्रभु ।। 42 ।। भगवद्गीतेचा संदर्भ अशासाठी दिलेला आहे की बाप्पा असोत वा श्रीकृष्ण दोघांचेही मनोगत एकच आहे हे लक्षात यावे.
बाप्पा म्हणतात, ज्ञानेंद्रियांचं महत्त्व आहेच. त्यांच्या मार्फत आपल्याला समस्त सृष्टीचे ज्ञान होत असते पण त्याचबरोबर त्या वस्तू आपल्याला हव्यात असा अट्टहास मन करू लागते. प्रत्यक्षात ती गोष्ट मिळवणं योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार मन करत नाही हे लक्षात घेऊन ईश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे. ही बुद्धी त्या वस्तूची योग्यायोग्यता, इष्टानिष्ठता ठरवते आणि त्याप्रमाणे मनाला मार्गदर्शन करते. त्याप्रमाणे वागत गेल्यास सर्वनाश टळतो म्हणून बाप्पा म्हणतात ज्ञानेंद्रिये श्रेष्ठ आहेत. त्यापेक्षा मन श्रेष्ठ आहे कारण इंद्रिये ही मनाच्या इच्छेनुसार काम करतात पण वस्तू जवळ असणं बरोबर आहे की नाही ते बुद्धी ठरवते. म्हणजेच मनाहून बुद्धी श्रेष्ठ झाली आणि ही बुद्धी देणारा बुद्धिदात्या ईश्वराचा आत्म्याच्या रूपाने आपल्या शरीरात असलेला अंश सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बुद्धीने आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न करावा असं बाप्पानी पुढील श्लोकात सांगितलंय.
क्रमश: