लोक करत असलेल्या कर्मांबाबत भगवंत उदासीन किंवा तटस्थ असतात
अध्याय नववा
जगाच्या निर्मितीचे तसेच तिचा लय करण्याचे सर्वाधिकार असणे हे भगवंतांचे ऐश्वर्य किंवा दिव्ययोग आहे. ब्रह्मदेवाचा दिवस उजाडला की, मायेच्या सहाय्याने विश्वाची निर्मिती भगवंत करतात आणि तो मावळताना मायेतच विश्वाचा लय होतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस एका कल्पाएव्हढा असतो. हा कालावधी लाखो वर्षांचा असतो. ब्रह्मदेवाची रात्रही तेव्हढीच म्हणजे हजारो लाखो वर्षांची असते. ती संपली की, उगवलेल्या नव्या दिवसाबरोबरच नवी भूतसृष्टी भगवंत मायेच्या सहाय्याने उदयाला आणतात. भूतसृष्टीच्या निर्मितीसाठी किंवा ती मायेत विलीन करण्यासाठी त्यांना काहीएक कष्ट करावे लागत नाहीत. एखादा घडीचा पंखा ज्या सहजतेने उलगडावा किंवा बंद करावा त्या सहजतेने विश्वाची निर्मिती व लय करणे भगवंतांना शक्य असते. तसेच मायेची निर्मिती करणे हा तर त्यांच्या हातचा मळ आहे. म्हणून साधूसंत जगाकडे भगवंतांची एक लीला म्हणून पाहतात. लीला म्हणजे सहज जाता जाता केलेली गोष्ट. एकदा माया निर्माण झाली की, विश्वाच्या निर्मितीची सर्व क्रिया माया पार पाडते.
हाती प्रकृति घेऊनि जागवी मी पुन्हा पुन्हा । भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो ।। 8 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्याच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी श्लोकात म्हंटल्यानुसार सर्व प्राण्यांचा समुदाय मायेच्या आधीन आहे. ज्याप्रमाणे बी पासून वेल आणि पाने भूमी उत्पन्न करते अथवा माणसाच्या बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण ह्या अवस्था देहापासून तयार होतात, वर्षाऋतुमुळे आकाशात मेघांची फळी तयार होते अथवा झोपेमुळे स्वप्न पडते त्याप्रमाणे भूतसमुदायाच्या अस्तित्वाला मायेचा आधार असतो. तिला भूतसमुदायाची मालकीण म्हंटले तरी चालेल. तिला भगवंतांचा भक्कम आधार असतो.
सर्व भूतसमुदायाच्या निर्मितीस ही मायाच कारणीभूत असते. साहजिकच भूतांची निर्मिती करण्याशी त्यांचा काहीच संबंध नसतो. पाण्यामध्ये चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात त्या वेली निर्माण करण्याचे काम चंद्र करत नाही त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती, स्थिती ह्यापासून भगवंत दूर असतात.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, धनंजया, विश्वाची उत्पत्ती आणि संहार ह्यापासून मी दूर असल्याने त्याबद्दल मी निरासक्त आणि उदासीन असतो. त्यामुळे मला ही कर्मे बांधू शकत नाहीत.
परी ही सगळी कर्मे बांधू न शकती मज। उदासीनापरी राहे अनासक्त
म्हणूनिया ।।9 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, कर्माच्या बंधनाबद्दल भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की, समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला की, मिठाचा घाट त्यास थोपवू शकत नाही, कारण मीठ पाण्यात विरघळून जाते. त्याप्रमाणे सर्व कर्मे माझ्यातच लय पावत असल्याने त्यांनी मला बांधून ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास प्रतिबंध करेल अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील तरच कर्मे मला बांधू शकतील.
क्रमश:
