देहाला प्रारब्धावर सोपवणाऱ्या संतांचा देव ऋणी असतो
अध्याय तिसरा
यज्ञाचे विविध प्रकार सांगताना बाप्पा म्हणाले, यज्ञाच्या पहिल्या प्रकारात योगी करत असलेल्या यज्ञामध्ये त्यांच्या ज्ञानेंद्रियांचे हवन करतात. म्हणजे त्यांना विषयांची भुरळ घालण्याची इंद्रियांच्या शक्तीवर ते संयम करतात. ती शक्ती ते त्यांना हवी तेव्हा वापरतात. त्यासाठी ते निरिच्छ झालेले असतात. त्यामुळे त्यांच्या मनात विषयांचे विचारच येत नसल्याने त्यांच्या इंद्रियांची सुट्टी झालेली असते. यज्ञाच्या दुसऱ्या प्रकारात मनात येणाऱ्या विचारांनी इंद्रिये कार्यरत होतात हे ओळखून मनात येणाऱ्या विचारांचे ते यज्ञातील अग्नीत हवन करून टाकतात. म्हणजेच योगसाधनेने मनाला निर्विचार करतात. त्यामुळे इंद्रियांची शब्द, स्पर्श, रूप, चव आणि गंध ही माणसाच्या मनाला प्रलोभन दाखवून त्याला फशी पडणारी हत्यारे आपोआपच निष्प्रभ होतात
पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, यज्ञाच्या तिसऱ्या प्रकारात योगी कर्मांचे आत्मानंदरुपी अग्नीत हवन करून टाकतात.
प्राणानामिन्द्रियाणां च परे कर्माणि कृत्स्नश । निजात्मरतिरूपे ग्नौ ज्ञानदीप्ते प्रजुह्वति ।।33 ।।
अर्थ-दुसरे कोणी प्राणांच्या आणि इंद्रियांच्या कर्मांचे सर्वथा ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मानंदरूपी अग्निमध्ये हवन करतात.
विवरण- माणसाच्या शरीरातील आंतरकर्मे ही प्राणांच्या मार्फत केली जातात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्रकारचे प्राण माणसाच्या शरीरात असतात. त्यांना ईश्वराने निरनिराळी कामे नेमून दिलेली आहेत आणि ती ते त्याच्या इच्छेनुसार आणि त्याला हवा तेव्हढा काळ पार पाडत असतात. तसेच माणसाची हात, पाय आदि कर्मेंद्रिये शरीराच्या बाहेरची कर्मे करत असतात. हीही कर्मे ईश्वरानेच माणसाला नेमून दिलेली असतात. ही बाह्य कर्मे करत असताना ती फळाच्या अपेक्षेने करायची की, निरपेक्षतेने करायची हे ठरवण्याचा अधिकार ईश्वराने माणसाला दिलेला आहे. निरपेक्षतेने कर्म करण्यात आपले भले आहे हे ज्याला समजले आहे तो त्याप्रमाणे वागून मुक्तीच्या दिशेने पुढे सरकत असतो.
प्राणांची आणि इंद्रियांची कर्मे ईश्वराच्या इच्छेवर अवलंबून आहेत हे पटून जो त्यानुसार वागत असतो, तो त्याचा देह प्रारब्धावर टाकून आत्मानंद उपभोगत असतो. म्हणजे एकप्रकारे आपल्या विहित कर्मांचे देव काय ते बघून घेईल ह्या विचारातून तो ती आत्मानंदात विरघळवून टाकतो. त्याच्या दृष्टीने आत्मानंदाच्या पुढे व्यावहारिक कर्माचे काहीच मोल नसते. ती झाली काय आणि नाही झाली काय त्याला सर्व सारखेच असते कारण त्याला कोणत्याही इच्छा होत नसतात. त्यामुळे कर्मे करून काही मिळवावे असे त्याच्या मनातही येत नाही. संत मंडळींनी ह्याचा पुरेपूर अनुभव घेतलेला असतो. म्हणून गोरा कुंभार त्यांच्या अभंगात म्हणतात, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. ह्यालाच देहापासून स्वत:ला अलग करून ईश्वर चिंतनात गुंतवणे, त्यातून मिळणाऱ्या आत्मानंदात मश्गुल होणे आणि त्याचवेळी देहाला प्रारब्धावर सोपवणे असे म्हणतात. असे ज्यांना साध्य होईल त्यांचा देव ऋणी असल्याने त्यांची कामे तो स्वत: करतो. कित्येक संत चरित्रे पहिली की, ह्याची जाणीव होते. येथे एखादा आळशी मनुष्य त्याची बाजू मांडताना असे विचारेल की, मलाही कोणतेही कर्म करावे असे वाटत नाही मग माझ्यात आणि योग्यात फरक कोणता? दोघांच्यातला मोठा फरक हाच आहे की, आळशी माणसाला इच्छा होत असतात परंतु त्याची कोणतेही कर्म करायची तयारी नसते. ह्याउलट योग्याला कोणतीही इच्छा होत नसल्याने ईश्वरीइच्छेनुसार त्याच्या हातून जे कर्म घडणार असते ते तो करतो पण निरिच्छ असल्याने त्यात गुंतून पडत नाही.
क्रमश: