For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परमेश्वर हा कायम असून त्याला जन्म व मृत्यू दोन्हीही नाहीत

06:07 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
परमेश्वर हा कायम असून त्याला जन्म व मृत्यू दोन्हीही नाहीत
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

भगवंतांनी पूर्वी कधीतरी सूर्याला कर्मयोग सांगितला होता ह्यावर अर्जुनाचा चटकन विश्वास बसला नाही. म्हणून तो भगवंतांना म्हणाला, हे अनंता! पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ते मला पटत नाही. विवस्वानं म्हणजे कोण, हे आपल्या वाडवडिलांनासुद्धा ठाऊक नाही आणि तू म्हणतोयस तू त्याला उपदेश केलास, हे कसे बरे शक्य आहे? कृष्णा तू तर अलीकडच्या काळात जन्माला आला आहेस. म्हणून तुझं बोलणं मला विसंगत वाटतंय. तेव्हा तू जे बोलतोयस ते सगळं मला समजावून सांग. अर्जुनाच्या शंकेचे उत्तर देताना भगवंत म्हणाले, अर्जुना! माझे व तुझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. त्या सर्वांना मी जाणतो पण तुला ते आठवत नाहीत.

परमेश्वर हा कायम असून त्याला जन्म व मृत्यू दोन्हीही नाहीत. जेव्हा तो भक्तांच्या रक्षणासाठी तसेच दुष्टांच्या विनाशासाठी योगमायेच्या सहाय्याने जन्म घेतो तेव्हा त्याला अवतार असे म्हणतात आणि त्यावेळी त्याला भगवंत असे संबोधतात. श्रीकृष्ण हा ईश्वराचा आठवा अवतार आहे.

Advertisement

पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला त्यांच्या स्वरूपाची कल्पना देत आहेत. ते म्हणतात, माझे स्वरूप अविनाशी असून मी अजन्मा आहे. सर्व भूतमात्रांचा ईश्वर आहे. आपल्या प्रकृतीला वश करून मी योगमायेने प्रकट होत असतो.

असूनि हि अजन्मा मी निर्विकार जगत्-प्रभु । माझी प्रकृति वेढूनि मायेने जन्मतो जणू ।। 6 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, मी अविनाशी आहे म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण होते. मी जन्मरहित आहे, तरीपण आवश्यक असेल तेव्हा मायेला हाताशी धरून मी अवतार धारण करत असतो. माझे अवतार घेणे व संपविणे, हा आरशात दिसणाऱ्या प्रतीबिंबाप्रमाणे एक भास आहे. माझे स्वातंत्र्य तर कधीही नष्ट होत नाही. अर्जुना! तसा मी निराकारच आहे. परंतु ज्यावेळी मी मायेचा आश्रय घेतो, त्यावेळी कांही विशेष कार्यासाठी मी सगुण रूप घेतो.

जरुरीप्रमाणे मी अवतार घेतो असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितल्यावर ते केव्हा आणि कशासाठी जन्म घेतात हा प्रश्न साहजिकच मनात येतो. त्या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. गीतेतील हा सुप्रसिद्ध श्लोक आहे. ते म्हणाले, हे भरतवंशी अर्जुना! जेंव्हा जेंव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म बळावू लागतो तेंव्हा मी अवतार घेतो.

गळूनि जातसे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना । अधर्म उठतो भारी तेंव्हा मी जन्म घेतसे ।। 7 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, धर्माच्या स्वरूपाचे प्रत्येक युगात भगवंतांनी रक्षण केले आहे आणि हा क्रम आवश्यकतेनुसार अगदी जगाच्या आरंभापासून चालत आलेला आहे. ज्या ज्या वेळी अधर्म फोफावल्याने धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, त्यावेळी ईश्वर अवतार धारण करतो.

आपण अवतार केव्हा धरण करतो हे सांगितल्यानंतर पुढील श्लोकात अवतारकाळात कोणते कार्य करतो हे स्पष्ट करताना भगवंत म्हणतात, सज्जनांच्या रक्षणाकरिता, दुर्जनांच्या नाशाकरिता व धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी युगा-युगात प्रकट होत असतो.

राखावया जगी संता दुष्टा दूर करावया । स्थापावया पुन्हा धर्म जन्मतो मी युगी युगी ।।8।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अर्जुनाच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देताना भगवंत म्हणाले, भक्तांचा कैवार घेण्यासाठी मी देह धारण करून अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.