For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रत्येक सजीव, निर्जीवात ईश्वर असतोच

06:10 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रत्येक सजीव  निर्जीवात ईश्वर असतोच
Advertisement

अध्याय पाचवा

Advertisement

योगाभ्यास करण्यासाठी मन स्थिर करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी करायला लागणाऱ्या उपायांची सविस्तर माहिती देऊन बाप्पा म्हणाले असे अथक प्रयत्न करणाऱ्याला फळही अत्युच्च दर्जाचे मिळते. त्याबद्दल ते सध्या आपण अभ्यासत असलेल्या श्लोकात सांगत आहेत. तो श्लोक असा, एवं कुर्वन्सदा योगी परां निर्वृतिमृच्छति । विश्वस्मिन्निजमात्मानं विश्वंच स्वात्मनीक्षते ।।15।। त्यानुसार सर्वदा अथक प्रयत्न करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ असे सुख पावतो. विश्वामध्ये आपला आत्मा व आपल्या आत्म्यामध्ये विश्व आहे असे तो पाहतो.

मनाला अंकित करून घेणाऱ्या साधकाच्या मनात सतत ईश्वराचे विचार घोळत असतात. त्यामुळे सहाजिकच त्याचे चित्त त्यावरच चिंतन करू लागते. ज्याप्रमाणे स्वत:च्या कोशात गुरफटून घेतलेला सुरवंट इतर कोणतीही हालचाल न करता स्वत:ला कोशात बंदिस्त करून घेतो आणि कोणत्याही हालअपेष्टा सोसून येथून आपली सुटका कशी होईल ह्याची वाट पहात असतो. त्याच्या एका ठिकाणी स्थिर राहण्याचे फळ म्हणून यथावकाश त्याचे एका सुंदर फुलपाखरात रुपांतर होते. त्याप्रमाणे स्थिर चित्ताने ईश्वरचिंतन करणाऱ्या योग्याच्या मनात केवळ ईश्वराचे विचार येत असल्याने हळूहळू त्यांची देहबुद्धी नष्ट होते. त्याला आपल्या मूळ स्वरुपाची ओळख पटून आपण ईश्वरस्वरूप आहोत अशी खात्री पटते.

Advertisement

देहबुद्धी नष्ट झालेला योगी, निर्विचार झालेला असल्याने त्याचे मन स्थिर असते. त्याला पराकोटीचे वैराग्य प्राप्त झालेले असल्याने सूक्ष्म बुद्धीने तो ईश्वर स्वरूपाचे दर्शन घेत असतो. सर्वोच्च लाभ प्राप्त झाल्याने त्याला बाह्य सुखदु:खाची जाणीव होत नसते. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होण्याची स्थिती तो सदोदित अनुभवत असतो. त्याला स्वत:तल्या ईश्वराची उपस्थिती तर जाणवत असतेच पण आजूबाजूच्या व्यक्ती, वस्तुत असलेला ईश्वरही स्पष्ट दिसत असतो. भक्त प्रल्हादालाही नामस्मरणाने ही स्थिती प्राप्त झालेली असल्याने त्याने छातीठोकपणे समोरच्या खांबात ईश्वर आहे हे त्याच्या पित्याला म्हणजे हिरण्यकश्यपूला सांगितले आणि त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूने त्या खांबाला लाथ मारल्यावर त्यातून नृसिंह अवतारात भगवंत प्रकट झाले. ईश्वर सर्वव्याप्त आहे. त्यामुळे त्याच्यातच सर्वजण सामावलेले आहेत तसेच सर्वांच्या ठिकाणी ईश्वर वसलेला आहे, ह्याची त्याला खात्री पटलेली असते. एका उदाहरणाने ही बाब समजावून घेऊ. समजा समोर साखरेचा ढीग आहे आणि त्या ढिगातून एखाद्याने साखरेची चित्रे तयार केली तर ती चित्रे त्या ढिगात पूर्वीपासूनच आहेत असे म्हणता येते. म्हणजे ईश्वराच्या पोटात सर्वजण आहेत हे सिद्ध होते. तसेच तयार झालेल्या चित्रात साखरेची उपस्थिती असतेच त्याप्रमाणे ईश्वराने तयार केलेल्या वस्तुत, प्राणीमात्रात ईश्वर हजर असतो हे मान्य होते. सामान्य मनुष्य प्रत्येक मातीच्या भांड्यातील मातीची उपस्थिती मान्य करतो किंवा दागिना कोणताही असो त्यात सोने हे असावयाचेच हेही त्याला मान्य असते. त्याप्रमाणे योग्याला सर्वत्र ईश्वराची उपस्थिती जाणवत असते. पुढील श्लोकात भगवंत सांगतात, असा जो दृश्य जगतातल्या विषयांची आकर्षणे लाथाडून, अथक प्रयत्नाने माझ्यापर्यंत पोहोचतो, त्याच्याबद्दल मला अत्यंत आदर वाटत असल्याने मीही त्याच्याकडे खेचला जातो. मी त्याला कधीही सोडत नाही तसेच तोही माझ्यापासून दूर जात नाही.

योगेन यो मामुपैति तमुपैम्यहमादरात् । मोचयामि न मुञ्चामि तमहं मां स न त्यजेत् ।। 16 ।।

अर्थ-जो माझ्याशी जोडून घेण्यासाठी माझ्याजवळ येतो त्याच्याजवळ मी आदराने जातो. मी त्याला मुक्त करतो. त्याचा त्याग करीत नाही. तसाच तोही मला टाकीत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.