महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भगवंतांनी जराव्याधावर संपूर्ण कृपा करायचे ठरवले

06:54 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

जराव्याध श्रीकृष्णांची स्तुती करताना म्हणाला, स्थूल सूक्ष्म आणि कारण ही देह धारण करण्याची मूळ कारणे आहेत. परंतु तुम्ही ईश्वरी अवतार असल्याने तुम्हाला चतुर्भुज देह धारण करण्यासाठी ह्यापैकी कोणत्याही कारणाची गरज नाही. योगमायेच्या सत्तेने तुम्ही लीलया नाना देह धारण करता नियतीच्या गतीप्रमाणे देहाला नाना भोग भोगावे लागतात. तुम्ही मात्र नियतीच्या प्रभावाने बाधित होत नसल्याने नाना भोगसंपत्ती भोगत असता. तुमच्या लीलेचा चमत्कार असा आहे की, तुम्ही आयुष्याशिवाय देह धारण करता. तुम्हाला आयुष्याची मर्यादा नसल्याने तुम्हाला मरण तुमच्या इच्छेनुसार येत असते. योगमायाही तुमच्या नजरेखाली काम करत असल्याने लीला करून तुम्ही समाजाला देहस्थिती दाखवता. तुमची ही लीला सर्वार्थाने सर्वांनाच अतर्क्य अशी आहे कारण त्यामागील कार्यकारण भाव कुणालाच कळत नाही. तसं बघितलं तर ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माता म्हणतात. त्यांनी ही सकल सृष्टी निर्माण केली पण त्यांनाही तुमच्या सत्तेची व्याप्ती कळत नाही. आता तुम्ही जे अनेक देह धारण करता त्याचा कर्ता ब्रह्मा खचितच नव्हे. तुम्ही स्वलिलेने देहधारण कसे करता, अवतार चरित्रे कशी घडवून आणता, देहत्याग कसा करता हे ब्रह्मादिकांना कळत नाही. शार्ङ्गपाणी श्रीकृष्णा अत्यंत सन्मानाने तुम्ही सदाशिवांना त्रिकाळज्ञानी मानता पण त्या सदाशिवांनाही तुमची अतर्क्य करणी उमगत नाही.

Advertisement

विशेष म्हणजे, सदाशिवाच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही मोहिनी रूप घेतलेत. तुमचे रूप पाहून ते तुमच्यावर भाळले कारण तुमचे रूप इतके मनमोहक असेल असे त्यांना न वाटल्याने मोहिनीरुप पाहिल्याक्षणी त्यांना त्या रुपाची भुरळ पडली. तुमची करणी अशी अद्भुत की, खुद्द सदाशिवांनाही त्याचा पत्ता लागला नाही. मायेचे पटल छेदून स्वानंदभुवनी सुखरूप असलेल्या आणि ज्ञान व योग उत्तम जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी सनकादिकानांही तुमच्या लीलाशक्तीचा अंदाज आला नाही. वेदशास्त्रात पारंगत असलेल्या बृहस्पत्यादि वाचस्पतीनाही

तुमची लीलाविग्रहस्थिती निश्चितपणे कळली नाही. जे परमार्थातील सज्ञान ज्ञाते आहेत त्यांचीही तर्कशक्ती तुमच्या अवतारशक्तीपुढे थिटी पडते. आत्मज्ञानी महात्म्यांची ही कथा मग इंद्रादि देवांना ती कळली नाही ह्यात काहीच विशेष नाही कारण इंद्रादि देव भोगनिष्ठ असल्याने त्यांच्यावर मायेचे आच्छादन असते. सहाजिकच तुमच्या लीलेची गोष्ट त्यांना कळणे शक्य नाही. देवांचीच अशी अवस्था होते म्हंटल्यावर सामान्य देहवंतांना तुमची लीला कळणे शक्यच नाही. श्रीकृष्णनाथा तुमची लीला सर्वांनाच सर्वथा अतर्क्य आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी कितीतरी कष्ट उपसावे लागतात पण तुम्ही अवतारकार्य करण्यासाठी लीलेने जे देह धारण करता त्या तुमच्या लीलेबद्दल जाणून घेण्यासाठी पडणाऱ्या कष्टापुढे ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी होणारे कष्ट काहीच नव्हेत. अतिसज्ञान मंडळींनीही त्यापुढे हात टेकलेले आहेत.

अशी सगळी कथा असताना मी असदगतीला पात्र असलेला अधम मनुष्य तुमचे सर्वथा अतर्क्य असलेले लीलेचे वर्णन काय करणार? तेव्हा आता मी थांबतो. उगीच बाष्कळ बडबड करण्यात अर्थ नाही. आता माझ्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मला देहदंड द्या. तुमच्या हातून देहदंड मिळाला की माझ्या सर्व पापांचे निर्दलन होईल. माझा उद्धार होण्यासाठी तेव्हढी कृपा करा. असं म्हणून जराव्याधाने श्रीकृष्णांना लोटांगण घातले आणि धावत जाऊन त्यांचे दोन्ही चरण पकडले. त्याने केलेली स्तुती ऐकून भगवंत प्रसन्न झाले. वेदांचे मंथन करून बोध सांगणाऱ्या, सगळ्या जगाचा आनंदकंद असणाऱ्या, स्वरूपाने स्वानंदशुद्ध असणाऱ्या भगवंतांनी जराव्याधावर संपूर्ण कृपा करायचे  ठरवले.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article