ईश्वर भक्तासाठी काहीही, अगदी काहीही करू शकतो
अध्याय आठवा
विश्वरूपाचे रौद्र रूप ना वरेण्याला सहन झाले ना अर्जुनाला, म्हणून त्या दोघांनी विनंती केली की, देवा आता हे विश्वरूप आवरा आणि तुमचे नेहमीचे सर्वांना सुख, समाधान देणारे सगुण रूप दाखवा. त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तुझ्यावर प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय, विश्वात्मक, अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. अर्जुना शरीर अर्पण करण्यापर्यंत ठीक आहे पण कुणाला आपला जीव अर्पण करणे ही गोष्ट आत्तापर्यंत माझ्या हातून कधीच घडली नाही. आज तो माझा जीव एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेखातर, हे एवढे विश्वरूप तुला दाखवले. हे माझे मायेपलीकडील स्वरूप अमर्याद असून कृष्णादिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. म्हणून विश्वरूपाच्या प्राप्तीने तू स्वत:ला धन्य मान. मन अधीर करून क्षुल्लक अशा चतुर्भुजरूपाच्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही.
भगवंतांनी एव्हढे समजाऊन सांगूनसुद्धा अर्जुनाने त्याचा हट्ट सोडला नाही त्यावर भगवंत म्हणाले, बरे तर आता तुझ्या म्हणण्यासारखे करू. माझे सगुण रूप तू खुशाल पहा, असे बोलून देव पुन्हा मनुष्य झाले. देवांनी असा बदल घडवून आणला यात काही मोठे आश्चर्य नाही. कारण त्यांना काहीच अशक्य नाही परंतु श्रीकृष्णाच्या मनात अर्जुनाविषयी जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच. त्यांनी विश्वरूपाच्या निमित्ताने आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले पण ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काही तरी खोड काढावी, त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूपात खोड्या काढून भगवंतांना चतुर्भुज रूप घ्यायला लावले.
देवांनी केवळ त्यांच्या लाडक्या अर्जुनासाठी त्यांच्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपाएवढा विस्तार केला. त्याच्या इच्छेनुसार विश्वरूप धारण केले. या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाला वाटणाऱ्या अमर्याद प्रेमाची कल्पना येते. अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखवले. प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती, याचे विश्वरूप केले, ते अर्जुनाच्या मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. सोन्याची लगड मोडून आपल्या इच्छेनुरूप दागिना घडवून घ्यावा आणि तो दागिना जर आपल्या मनाला पसंत पडला नाही तर तो पुन्हा आटवून टाकावा, त्याप्रमाणे येथे घडले. शिष्याच्या प्रीतीकरता त्याने कितीही त्रास दिला तरी सद्गुरु तो सहन करतात. देवाच्या मनात अर्जुनाविषयी किती प्रेम आहे, ते कळत नाही. श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्णरूपात एकत्र साठवले.
जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती, ती अर्जुनाच्या पसंती करता देवांनी उलगडून दाखवली पण एखादे वस्त्र विकत घेणारे गिऱ्हाइक जसे त्या वस्त्राची लांबी, रुंदी व रंग सहज पाहते त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी, रुंदी व रंग पाहिला पण अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभव नाही हे लक्षात घेऊन देवांनी विश्वरूपी वस्त्राची पुन्हा सगुणरूपी घडी केली. त्यामुळे विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले. श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले आणि भ्यायलेल्या अर्जुनाला धीर दिला. प्रसन्न झालेला ईश्वर भक्तासाठी काहीही, अगदी काहीही करू शकतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
क्रमश: