बकरी चोरणाऱ्या जोडगोळीला अटक
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
तीन ठिकाणी झालेल्या बकरी चोरी प्रकरणांचा छडा लावण्यात यमकनमर्डी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करून दीड लाख रुपये किमतीची सात बकरी ताब्यात घेण्यात आली आहेत.
लक्ष्मण कणबर्गी (वय 30) रा. अंकलगी ता. गोकाक, सिद्धाप्पा नाईक (वय 27) रा. बन्नीबागी ता. हुक्केरी अशी त्यांची नावे आहेत. यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील होसूर, हुक्केरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अर्जुनवाड आणि अंकलगी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील कुंदरगी गावातून बकरी चोरण्यात आली होती. वरील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बकरी चोरल्याची कबुली दिली. बकरी चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी 800 आणि दिवसा टेहळणी करण्यासाठी वापरण्यात येणारी एक मोटारसायकल जप्त केली आहे. वाहन तपासणी करीत असताना एका संशयास्पद कारची तपासणी करताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, उपनिरीक्षक बी. के. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.