नंदगड येथे पाळीव डुकरांकडून बकऱ्यावर हल्ला
बंदोबस्त करण्याची सूचना करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही नाही
वार्ताहर/नंदगड
नंदगड गावातील पाळीव डुकरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमदार व पोलीस यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायतीच्या बैठकीत डुक्कर मालकांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची सूचना करूनही अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. उलट पाळीव डुकरांकडून बकऱ्यांच्या पिल्लावर हल्ला करण्याच्या घटनात वाढ झाली आहे. गत आठवड्यात जुने नंदगडमध्ये हल्ल्याच्या दोन घटना घडल्या होत्या. येथील अब्दुलखादर शिंगरगाव यांच्या बकऱ्यावर डुकरांच्या कळपाने हल्ला करून जखमी केले आहे. तर काबीज मुजीरअहमद झुंजवाडकर यांच्या बकरीच्या पिल्लावर हल्ला करून पायाला दुखापत केली आहे.
गावातील घराच्या पाठीमागे डुकरांचा कळप अन्न-पाण्याच्या शोधात फिरत असतो. दरम्यान, एखादे लहान मूल कळपाच्या तावडीत सापडल्यास जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महिलांच्या अंगावर काही डुक्कर धावून येत असल्याचेही महिलांकडून सांगण्यात येते. येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदगड येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीची यात्रा होणार आहे. त्यामुळे आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. गावातील स्वच्छता व विकासकामांसंदर्भात दहा दिवसांपूर्वी नंदगड ग्रा. पं. ची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीतच डुक्कर मालकांना डुकरांचा बंदोबस्त करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु अद्याप डुकरांचा कळप गावात फिरतानाच दिसत आहे.