गोव्याचा प्रतिभाशाली बुद्धिबळपटू : देवेश नाईक
नरेश गावणेकर/फोंडा
बुद्धिबळ खेळात गोव्यातील अनेक खेळाडू आज नावलौकीक मिळविताना दिसत आहेत. यापैकी एक वाजे-शिरोडा येथील देवेश आनंद नाईक या प्रतिभाशाली खेळाडूने उंच भरारी घेतली आहे. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 11 ते 19 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या स्व. मनोहर पर्रीकर गोवा आतंरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत त्याने ‘ब’ गटात दहावा क्रमांक पटकावून आपली क्षमता दाखविली आहे. आतापर्यंत त्याने 13 राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व केले असून 21 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आतापर्यंत त्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकूण 179 चषक व 23 मेडल्स पटकाविली आहेत.
स्व. मनोहर पर्रीकर स्पर्धेत ‘ब’ गटात गोव्यासह भारतीय तसेच काही परदेशी खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे दहावे स्थान मिळविणे ही मोठी उपलब्धता आहे. 19 वर्षीय देवेशने दहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळाला सुरुवात केली. शांत व संयमी स्वभाव असल्याने त्याचा मावसा राजेंद्र गावस यांनी त्याला बुद्धिबळ खेळायला प्रेरीत केले. वडीलांनी त्याला मडगाव येथील पुरुषोत्तम कंटक यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले. त्यानंतर सागचे प्रशिक्षक संजय कवळेकर, नीरज सारीपल्ली तसेच फोंडा येथील अमोघ नमशीकर यांच्याकडे त्याने प्रशिक्षण घेतले आहे. देवेशचे सध्या स्टँडर्ड प्रकारात 1957 इलो मानांकन आहे. देवेशने दहावीपर्यंत मडगाव येथील भाटीकर इंग्लिश मॉडेल हायस्कूल व उच्च माध्यमिक शिक्षण स्टेलार अकादमी आर्लेम येथे घेतले आहे. सध्या तो पात्रता प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहे.
राष्ट्रीय स्कूल गेम्स, खुल्या स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व
2016 साली तेलंगणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्कूल गेम्स, 2017 साली नागपूर येथील राष्ट्रीय स्कूल गेम्स, 2018 साली 13 वर्षाखालील अहमदाबाद येथील खुल्या राष्ट्रीय स्पर्धेत, 2017 साली अहमदाबाद राष्ट्रीय चॅलेंजर्स स्पर्धा, 2018 साली ओरिसा येथील राष्ट्रीय स्कूल गेम्स व गुजरात येथील 13 वर्षाखालील खुली राष्ट्रीय स्पर्धा, दादरा व नगर हवेली येथील राष्ट्रीय स्कूल गेम्स (रौप्यपदक), नवी दिल्ली येथे 19 वर्षाखालील खुली राष्ट्रीय स्पर्धा, 2019 साली छत्तिसगड येथील राष्ट्रीय स्कूल गेम्स, तामिळनाडू येथील 15 वर्षाखालील खुली राष्ट्रीय स्पर्धा, भोपाळ येथे राष्ट्रीय अमेच्युअर बुद्धिबळ स्पर्धा, औरंगाबाद महाराष्ट्र येथे 14 वर्षाखालील खुली राष्ट्रीय स्पर्धा (रौप्यपदक) व 2023 साली पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग
नवी दिल्ली येथे झालेल्या पश्चिम आशियाई युथ व ज्युनिअर स्पर्धा, मुंबई येथील मेयर्स कप आतंरराष्ट्रीय स्पर्धेत सलग तीन वेळा, सुरज इंटरनॅशनल फिडे स्पर्धा, पुणे येथील स्व. भारतीबाई हलकुडे स्पर्धा, गुजरात इंटरनॅशनल स्पर्धा, बेंगलुरु येथील राज व्हील फॅक्टरी इंटरनॅशनल, बेंगलुरु येथील कांदोर अखिल भारतीय खुली स्पर्धा, केरळ येथे केसीए फिडे रेटेड स्पर्धा सलग तीन वर्षे, बेंगलुरु रुरल डिस्ट्रिक्ट स्पर्धा, क्वीन्स इंटरनॅशनल केरळ, सुरज फिडे रेटिंग सांगली, कालराव फिडे रेटिंग गुजरात, केरळ फिडे रेटेड स्पर्धा, केसीएम फिडे रेटेड कोईंबतूर, आयआयएफएल वेल्थ मुंबई ज्युनिअर स्पर्धा व इंटरनॅशनल स्पर्धा अशा स्पर्धांत त्याने सहभाग घेतला आहे.
राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अनेक पारितोषिके
मुरगांव येथे झालेल्या स्व. व्यंकटेश व सुमती शानभाग स्पर्धेत देवेशने तीन वेळा अजिंक्यपद, 2024 साली तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित स्व. लेफ्टनंट कमांडर गोपाळ सुखटणकर स्पर्धेत अजिंक्यपद, केपे तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय खुल्या फिडे मानांकन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले आहे. 2018 साली कुडचडे येथे झालेल्या वरीष्ठ स्पर्धेत व 19 वर्षाखालील गटात त्याने तृतीय स्थान, फातोर्डा येथील अखिल गोवा सेनीओ बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय, 2019 साली म्हापसा येथील सारस्वत महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 15 वर्षाखालील गटात प्रथम, 2021 साली अखिल गोवा 20 वर्षाखालील गटात प्रथम, 2023 साली अखिल गोवा स्पर्धेत प्रथम, 2024 साली तृतीय स्थान प्राप्त केले. देवेशला बुद्धिबळ क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी आई सुनिता व वडील आनंद यांचा पाठींबा लाभत आहे. नेदरलँड्सचा बुद्धिबळ खेळाडू अनीश गिरी हा देवेशचा आवडता खेळाडू आहे. यावर्षी मे महिन्यात दुबई येथे होणाऱ्या स्पर्धेत तो सहभागी होणार आहे. देवेशला शिक्षणाबरोबरच बुद्धिबळातही उच्च पातळी गाठायची असून या खेळातील ‘टायटल्स’ मिळविण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे.