For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हादईसंबंधी याचिकेत गोव्याची बाजू भक्कम : शिरोडकर

11:29 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
म्हादईसंबंधी याचिकेत गोव्याची बाजू भक्कम   शिरोडकर
Advertisement

राज्यात 100 बंधारे बांधण्याचा प्रस्ताव : तिलारी धरण प्रकल्पात गोव्याचा वाटा 1465 कोटींचा

Advertisement

पणजी  : सर्वोच्च न्यायालयात म्हादईसंबंधीच्या याचिकेत गोव्याची बाजू भक्कम आहे. म्हादईबाबत गोवा सरकार गंभीर आहे. प्रवाह समितीने योग्यवेळी म्हादई पात्राची पाहणी केलेली आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. पाणीपुरवठा तसेच सहकार खात्याच्या मागण्यांवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते.  राज्यात कूपनलिका (बोअरवेल) आकडा वाढत आहे. बेकायदा कूपनलिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू होणार आहे. तसेच दरवर्षी कूपनलिकांचा आकडा कमी करण्यासाठी सरकारचा भर राहील. राज्यात पाण्याची समस्यांची उणीव नाही. तरीही पुढे पाण्याची समस्या होऊ नये, यासाठी नियोजन सुरू आहे. याचाच भाग म्हणून कुशावती नदीतील पाण्याचा उपसा करून पाण्याचा वापर होईल. तसेच राज्यात 100 बंधारे बांधण्याचा प्रस्ताव आहे. 2026 सालापर्यंत राज्यात बंधाऱ्यांचा आकडा 500 पर्यंत पोहचेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

काजूमळ, काकोडा आणि शिरोडा या ठिकाणी  धरण उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तिलारी धरणात पाणी साठवण्याची टाकी वाढविण्याचे महाराष्ट्र सरकारने मान्य केलेले आहे. तिलारी धरण प्रकल्पाच्या दुऊस्तीचे काम पूर्ण झालेले आहे. तिलारी धरण प्रकल्पात गोव्याचा वाटा 1465 कोटींचा आहे. साळावली धरणाच्या कालव्याची दुऊस्ती करण्यात येणार आहे. साळ येथील पाणी प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या सर्व गोष्टींमुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. चरावणे या ठिकाणी धरण उभारण्याचा प्रस्ताव जुना आहे. हा प्रस्ताव पुढे गेलाच नाही. नव्याने चरावणे धरणाच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यात येईल, असे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सभागृहात सांगितले.

Advertisement

गैरव्यवहार असलेल्या सोसायट्यांबाबत आठ महिन्यात निर्णय 

माशेल महिला अर्बन, व्हिजनरी या सहकारी सोसायट्यांबरोबरच चार सोसायट्यांवर गुन्हा नोंद झालेला आहे. येत्या सहा ते आठ महिन्यांत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येईल, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

गोवा डेअरी फायद्यात

गेल्या सहा महिन्यांत गोवा डेअरी फायद्यात आहे. शेतकऱ्यांना दर महिन्याच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आधारभूत किंमत देण्यात येईल. डिसेंबर 2025 पर्यंत सर्व सहकारी सोसायट्यांचे संगणकीकरण होईल. सहकारी संबंधित प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एखादी संस्था स्थापन होईल. सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम पूरक ठरेल, असे मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले.

औद्योगिक वसाहतीतील कूपनलिकांवर कारवाई करा : युरी आलेमाव

तिलारीचा कॅनल परत परत  तुटतो याची कारणे सरकारने विधानसभा सभागृहात द्यावी, तसेच पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत 40 बांधकामे झालीत परंतु 120 जलस्रोत प्रदूषित झाले आहेत यावर सरकारने कोणती उपाययोजना केली आहे, त्याची माहिती द्यावी, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सरकारकडे मागणी केली. कुंकळी औद्योगिक वसाहतीत 130 बेकायदेशीर कूपनलिका आहेत, त्यावर सरकारने कोणती कारवाई केली, असे युरी आलेमाव यांनी विचारणा केली आहे.

गोवा डेअरीच्या घोटाळ्याशी संबंधितांवर कारवाई का नाही : विजय सरदेसाई 

बेकायदेशीर कूपनलिकांचे प्रकार वाढले आहेत. भूगर्भजल प्रदूषित झालेले आहेत. तसेच गोवा डेअरीचा मुद्दा उपस्थित करताना डेअरीचे संचालक अपात्र झाले आहेत.  घोटाळा झाला तरीही कोणावरही कारवाई का झाली नाही, अशी विचारणा आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा सभागृहात केली. संजीवनी साखर कारखान्याच्या  कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय याविषयी सरदेसाई यांनी मुद्दे उपस्थित केले. धरणाच्या बाजूला असलेल्या गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, अशी तक्रार करून सार्वजनिक बांधकाम खाते आणि जलस्रोत खाते यांच्यात ताळमेळ नाही म्हणून असे प्रकार घडत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभा सभागृहात केला.

Advertisement
Tags :

.