डिसेंबरमध्ये गोव्याच्या महसूल संकलनात उल्लेखनीय वाढ
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पणजी : गोव्याने डिसेंबर 2024 मध्ये महसूल संकलनात उल्लेखनीय वाढ नोंदवली असून, गत डिसेंबरच्या तुलनेत 75.51 कोटी ऊपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे डिसेंबर 2024 हा राज्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरला, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले आहेत. ही संख्या सकारात्मक आर्थिक गतीचे संकेत देणारा मजबूत कल दर्शविते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत गोव्याचा एकूण महसूल 4614.77 कोटी ऊपयांवर पोहोचला आहे, वर्ष 2023 मधील याच कालावधीत कमावलेल्या 4249.34 कोटी ऊपयांपेक्षा हा महसूल 365.43 कोटी ऊपये अधिक आहे. या भरीव वाढीमध्ये जीएसटी आणि व्हॅट दोन्ही महसूल समाविष्ट आहेत. राज्याच्या सुधारित आर्थिक कामगिरीचे प्रदर्शन करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत जीएसटी संकलनात 9.62 टक्के वाढ दिसली. जी कर सुधारणा आणि आर्थिक सुधारणांची प्रभाविता दर्शवते. त्याचबरोबर व्हॅट महसुलात देखील 6.41 टक्क्यांची वाढ नोंद झाली आहे. जीएसटी आणि व्हॅट दोन्ही एकत्र करून एकूण महसुलाची 8.60 टक्के एवढी प्रभावी वाढ आहे. ही आकडेवारी गोव्याची सतत आर्थिक वाढ आणि वित्तीय सशक्तीपणावर प्रकाश टाकते. म्हणूनच डिसेंबर 2024 हा राज्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तसेच विक्रमी संख्येने पर्यटकांचे आगमन झाल्यामुळे गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पर्यटनक्षेत्रानेही या वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.