वेधशाळा मनोऱ्याने गोव्याचा जगात डंका
केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज भूमिपूजन
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसित भारताचे’ बाळगलेले ध्येय प्रत्येक टप्प्यावर पूर्ण होत आहे. मोदींना केंद्रीय नेत्यांचीही मिळालेली साथ आणि योगदान हे अतुलनीय आहे. त्याच दृष्टीकोनातून केंद्रीय रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात अनेक लोककल्याणकारी प्रकल्प राबविले आहेत. लोककल्याणकारी ठरलेला झुआरी नदीवरील पूल आणि आता प्रस्तावित ‘वेधशाळा मनोरा प्रकल्प’ हा राज्याच्या विकासाला गती देणारा ठरणारा आहे. शिवाय या प्रकल्पाचा जगभरात डंका राहणार आहे.
प्रस्तावित वेधशाळा मनोरा प्रकल्पाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज शुक्रवारी 23 रोजी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. हा समारंभ चिखली पंचायत सभागृहात होणार असून, व्हर्च्युअल पद्धतीने पायाभरणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्य वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास, सांत आंद्रे मतदारसंघाचे आमदार विरेश बोरकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित राहणार आहेत.
मनोऱ्यासाठी 270 कोटी खर्च
वेधशाळा मनोरा प्रकल्प पाच वर्षांच्या काळात पूर्णत्वास येणार असून, या प्रकल्पासाठी सुमारे 270 कोटी ऊपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेऊन वेधशाळा मनोरे उभारले जाणार आहेत. याशिवाय फिरते उपहारगृह, कला दालन यांचा समावेश करून जागतिक पर्यटनाच्या आकर्षणासाठी विचार करून तसे आरेखन करण्यात आले आहे. डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर म्हणजे आरेखन, बांधणी, वित्तपुरवठा, चालवा आणि हस्तांतरीत करा या प्राऊपावर हा प्रकल्प पूर्णत्वास आणण्यात येणार असल्याने या प्रकल्पाचा कोणताही आर्थिक ताण सरकारवर पडणार नाही.
वेधशाळा मनोऱ्याविषयी...
- वेधशाळा मनोऱ्यामधील प्रत्येक मनोरा 125 मीटर उंचीचा असेल.
- 8.50 मीटर गुणिले 5.50 मीटर या परिमाणांचे शाफ्ट मनोऱ्यामध्ये असतील.
- सर्वोच्च स्तरावर किमान 22.50 मीटर गुणिले 17.80 मीटर आकाराचे दोन मोठे मजले असतील.
- मनोरा चढण्यासाठी कॅप्सुल लिफ्टची सोय असल्याने विहंगम दृष्ट्याचा आनंद लुटण्यास मिळणार आहे.
- पॅरिसमधील आयफेल टॉवरच्या धर्तीवर गोव्याचा नावलौकिक सातासमुद्रा पार करण्यासाठी अनोख्या पद्धतीची असेल रचना.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचे बाळगलेले स्वप्न आणि त्या दिशेने सुरू असलेला प्रवास हा अनेक यशस्वी प्रकल्पांवरून सिद्ध होत आहे. गोवा राज्यालाही केंद्र सरकारने भरभरून दिलेले आहे, त्यामुळेच आज लोकोपयुक्त प्रकल्प दिमाखात उभे आहेत. झुआरी नदीवरील पूल आणि प्रस्तावित वेधशाळा मनोरा हा राज्याच्या विकासाचे प्रमुख प्रतिक आहे.”
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
“गोव्यात आज विकासाची घोडदौड सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा घेतलेला ध्यास संबंध भारतीयांच्या कल्याणासाठी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही गोव्याच्या विकासात मोठे योगदान देऊन गोव्यात अनेक साधनसुविधात्मक प्रकल्प राबविण्यास हातभार लावला आहे. झुआरी नदीवरील पूल आणि प्रस्तावित वेधशाळा मनोरा या प्रकल्पामुळे गोव्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचणार आहे.”
- सदानंद शेट तानावडे, राज्यसभा खासदार