For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज ठरणार गोव्याचे नवे झेडपी!

10:27 AM Dec 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
आज ठरणार गोव्याचे नवे झेडपी
Advertisement

एकूण 50 पदांसाठी 226 उमेदवार झुंजले : आज 15 केंद्रांत मतमोजणी, 600 कर्मचारी

Advertisement

पणजी : उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या एकूण 50 जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 226 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. आज सोमवार  दि. 22 डिसेंबर रोजी सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ होणार असून त्यानंतर निकाल जाहीर होऊन विजयी उमेदवारांची घोषणा होणार आहे. जिल्हा पंचायतींसाठी शनिवारी झालेल्या निवडणुकीत 295720 पुऊष, 319859 महिला आणि 2 तृतीयपंथी मिळून एकूण 615581 जणांनी मतदान केले आहे.  राज्यातील 869356 मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी विक्रमी म्हणजे 70.81 टक्के एवढी होती. निवडणुकीत भाजप, मगो, काँग्रेस, आप, आरजी, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष मिळून 226 उमेदवारांचा समावेश होता. या निवडणुकीचा एकंदर कल पाहता ती एकतर्फीच झाल्यासारखे दिसत होते. परंतु एकतर्फी भाजप, काँग्रेस की आणखी कुणाच्या बाजूने झाली आहे त्याचे चित्र आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींच्या मतमोजणीसाठी 15 केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहे.

 600 कर्मचारी-अधिकारी तैनात

Advertisement

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या कामासाठी 600 कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले असून सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सर्व केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यानंतर हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट होत राहणार आहे. हल्लीच्या वर्षांमध्ये ईव्हीएमद्वारे होणाऱ्या मतदानामुळे झटक्यात निकाल हाती पडण्याची सवय नागरिकांना झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यमान निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे मतपत्रिका मोजण्यात तसेच काही उमेदवारांकडून होणाऱ्या फेरमोजणीच्या मागणीमुळे निकाल जाहीर होण्यात काही प्रमाणात उशीर होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीत टक्केवारी वाढल्यामुळे उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची दावेदारी किती खरी-खोटी हे देखील निकालानंतर समोर येणार आहे. महिला मतदार जास्त व त्यांचे मतदान प्रमाणही वाढल्यामुळे त्यांचा कौल महत्त्वाचा ठरणार अशी चिन्हे दिसत आहेत. तसेच या निकालावरून मतदारांचा एकंदरीत कल दिसून येणार आहे. ही निवडणूक म्हणजे 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमिफायनल समजली जात आहे. त्यामुळे तमाम नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आजारी, वृद्धांना घरी मतदानाची व्यवस्था न केल्याने नाराजी

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आजारी व वृद्ध मतदारांकरिता घरी भेटी देऊन मते देण्याची सुविधा न दिल्यामुळे अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक मतदारांना विविध कारणांमुळे मतदान केंद्रांपर्यंत जाता येत नाही. काही मतदार आजारी असतात तर काही वृद्ध खूप आजारी किंवा बेडवरच असतात त्यांना मतदानाची इच्छा असते. परंतु केंद्रात जाऊन मतदान करणे त्यांना शक्य नसते. तेव्हा घरी येऊन आपले मतदान स्वीकारावे, अशी त्यांची इच्छा असते. ती जि. पं. निवडणुकीत पूर्ण झाली नाही. त्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही, त्यांची इच्छा अपूर्ण राहिली आणि मतही वाया गेले. वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत घरी मतदान करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. तशी सुविधा या मतदानात असायला हवी होती. ती पुढील मतदानात उपलब्ध करावी, अशी मागणी पुढे आली आहे. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ‘नोटा’चा पर्याय देण्यात येतो तसा पर्याय या जि. पं. निवडणुकीत मतपत्रिकेतून दिला नाही. त्याचा समावेश पुढील निवडणुकीत करण्यात यावा, अशी सूचनाही काही मतदारांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.