घनकचरा व्यवस्थापनात गोव्याचे मॉडेल आदर्शवत!
केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार
प्रतिनिधी/ पणजी
महाराष्ट्रातील पुणे जिह्यात शनिवारी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची 27 वी बैठक झाली. या बैठकीत गोव्यातील घनकचरा व्यवस्थापनाचा गवगवा महाराष्ट्रात झाला. कारण घनकचरा व्यवस्थापनात गोव्याने राबविलेले मॉडेल हे आदर्शवत आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.
या परिषदेला महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या राज्यांचे मुख्यमंत्री, प्रशासक, वरिष्ठ मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा नगर हवेली आणि दीव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.
या बैठकीत पश्चिम विभागातील प्रमुख विकासात्मक मुद्यांवर चर्चा झाली. ज्यामध्ये प्रादेशिक विकास आणि सहकार्याला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा, सहकार क्षेत्राचा विकास आदींचा समावेश होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाची माहिती देताना गोव्याचे हे मॉडेल अत्यंत सुटसुटीत असल्याचे उदाहरणासह सांगितले. गोवा सरकार घनकचरा व्यवस्थापनात राबवित असलेल्या उपक्रमांविषयीचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कौतुक केले.
सहकार क्षेत्राच्या विकासासाठी अमित शहा यांच्याशी चर्चा
राज्यातील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याशी दीर्घ चर्चा केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेबाबतही गोव्याच्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्यासमवेत सल्लामसलत केली. देशात 1,465 नागरी सहकारी बँका आहेत. त्याचा लाभ ग्रामीण भागाला होण्यासाठी केंद्र सरकार अग्रेसर आहे. त्यासाठी अंब्रेला ही संस्था सक्रिय करण्यात येत आहे. ज्याद्वारे सर्व सहकारी बँकांना सर्व प्रकारे मदत मिळणार आहे. अंब्रेला संस्थेसाठी 300 कोटी ऊपयांचे बजेट देखील केंद्राने मंजूर केले आहे, त्याच दृष्टीकोनातून गोव्याला फायदा व्हावा, यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी शहा यांच्यासोबत चर्चा केली आहे.