विकसित भारतासाठी गोव्याचे मोठे योगदान
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे चंदीगढमध्ये प्रतिपादन
पणजी : विकसित भारत 2027 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गोवा राज्य योगदान देणार असून ते महत्त्वाचे ठरणार आहे. आत्मनिर्भर भारतासाठी गोवा आतापासूनच कामाला लागला असल्याचेही त्यांनी नमूद केले. चंदिगढ येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे (एनडीए) आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री परिषदेत डॉ. सावंत यांनी वरील निवेदन केले. पर्यटन, संस्कृती, उद्योग नवनिर्मितीमध्ये गोवा अग्रेसर असून देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले म्हणून त्यांचे अभिनंदन करणारा ठराव परिषदेतून मांडण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ठराव सादर केला तर गोव्याचे मुख्यमंत्री यांनी त्यास अनुमोदन दिले.
भारत पूर्णपणे 2047 पर्यंत विकसित करण्याचे स्वप्न देशाने बाळगले असून गोवा त्यात खारीचा पण मोठा वाटा उचलणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने चंदिगढ येथे मुख्यमंत्री परिषद बोलावली होती. परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे खास उपस्थित होते. आघाडीचे सरकार असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना परिषदेसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यानुसार उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व इतर राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी परिषदेसाठी हजेरी लावली होती.