भाजपमुळेच गोव्याचा विकास!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : मुक्तिदिन सोहळ्यात हुतात्म्यांचे स्मरण
पणजी : केंद्रातील आणि राज्यातील भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळेच गोव्यात सर्वांगीण विकास होऊ शकला. गत 50 वर्षांत गोव्याचा विकास खुंटला होता. विकासाला गती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच झाले आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. गोवा विद्यापीठाच्या बांबोळी येथील मैदानावर गुऊवारी आयोजित 63 व्या गोवा मुक्तीदिन सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात गोवा मुक्तीसाठी हौतात्म्य पत्करलेल्यांचे तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांकडून मुख्यमंत्री सावंत यांनी मानवंदना स्वीकारली. या कार्यक्रमाला विविध खात्यांचे वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोव्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या दहा वर्षांत अनेक सकारात्मक पावले उचलली. त्याचे फळ गोवा आणि गोमंतकीय जनतेला मिळत आहे. राज्य सरकारने राबवलेल्या ‘स्वयंपूर्ण गोवा’चा अनेकांना लाभ मिळत आहे.
चाळीस टक्के जनतेला मोफत पाणी
राज्यातील ‘हर घर नल’ योजनेखाली 40 टक्के जनतेला मोफत पाणी देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. राज्यातील मच्छीमार बांधवांना पाठबळ देण्याच्या उद्दिष्टाने मत्स्यसंपदा योजना चालीस लावली. या योजनेचा लाभ 500 हून अधिक मच्छीमारांना झालेला आहे.
वीज, इंटरनेटमध्ये मोठी सुधारणा
राज्यातील वीज व्यवस्थेतही बरीच सुधारणा करताना सध्या 1,130 कोटींची भूमिगत वीज वहिन्यांची कामे सुरू आहेत. मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 4 जी बीएसएनएल टॉवरचे जाळे विणले जात आहे. यंदा ‘आयपीबी’कडून 1,059 कोटींच्या 15 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून, त्यातून 1,894 जणांना रोजगार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला सबलीकरणासाठी प्रयत्न
महिला सबलीकरणासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा लाभ लाखो महिला घेत आहेत. पुढील वर्षभरात राज्यात 17 हजार ‘लखपती दीदी’ तयार होणार असून, त्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सर्व घटकांनी एकोपा राखावा, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.