गोव्याचा होतकरू कबड्डीपटू : रामा वेळीप
नरेश गावणेकर/फोंडा
कबड्डी या पारंपारिक खेळाला आता पुन्हा प्रतिष्ठा लाभली आहे. प्रो-कबड्डी सुरु झाल्यापासून युवावर्ग या खेळाकडे आकर्षित होत आहे. परंतु गोव्याच्या ग्रामीण भागात हा खेळ पूर्वीपासून मोठ्या उत्साहाने खेळला जातो. बार्शे-केपे या गावातील मुले कबड्डीत मोठी प्रगती साधत आहे. रामा कृष्णा वेळीप हा या गावातील एक होतकरू खेळाडू गोव्याला लाभला आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांने अनेकवेळा उत्कृष्ट बचावपटू म्हणून पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यांने दहावेळा राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. 25 वर्षीय रामाने गोव्याच्या कनिष्ठ संघात सहावेळा व वरिष्ठ गटात चार वेळा प्रतिनिधीत्व केले. बांदोडा फोंडा येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत त्याला उत्कृष्ट बचावपटू म्हणून पुरस्कार लाभला.
राज्यात होत असलेल्या स्पर्धेत त्यांनी कित्येकवेळा पुरस्कार मिळवले आहेत. रामाला लहानपणापासून कबड्डी खेळाचे आकर्षण होते. गावातील मुलांना तो कबड्डी खेळताना पाहत असे. इयत्ता सातवीत शिकताना तो या खेळात सहभागी झाला. गावचे तसेच गोवा क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक गोकुळदास गावकर यांनी त्याला प्रोत्साहित करून प्रशिक्षण दिले. यानंतर पाडी केपे येथील सरकारी हायस्कूलसाठी आंतरशालेय स्पर्धेत खेळताना त्याने हायस्कूलसाठी अनेक विजेतेपदे मिळवून दिली. बाळ्ळी येथील स्वामी विवेकानंद उच्च माध्यमिक व कुंकळ्ळी येथील सी. ई. एस महाविद्यालयाचे तसेच गोवा विद्यापीठाचे त्यांने प्रतिनिधीत्व केले. घरच्या सामान्य परिस्थितीमुळे महाविद्यालयात दुसऱ्या वर्षानंतर त्याला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यानंतर खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये कारचालक म्हणून तो नोकरीला लागला.
गोवा संघाचे प्रतिनिधीत्व
या दरम्यान रामा गावच्या सिद्धेश्वर स्पोर्टस् क्लबसाठी खेळू लागला. या संघातून त्यांने कबड्डी बरोबरच व्हॉलीबॉल व फुटबॉल राज्यपातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन अजिंक्यपदे प्राप्त केली. रनिंग व सायक्लींग याची त्याला आवड आहे. काणकोण येथील लोकोत्सवातील कबड्डी स्पर्धेतही त्यांने भाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. कबड्डीतील त्याच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला गोवा संघात स्थान मिळाले आहे. 2023 साली गोव्यात झालेल्या 37 व्या राष्ट्रीय खेळात, महाराष्ट्र येथे झालेल्या 70 व्या व ओडीशा येथे झालेल्या 71 व्या राष्ट्रीय स्पर्धेत गोवा संघात त्याची निवड झाली. 2022 साली भुवनेश्वर-ओडीशा येथे झालेल्या राष्ट्रीय एस.टी कबड्डी स्पर्धेत त्यांने उत्कृष्ट कामगिरी बजावली. राज्यातील स्पर्धेत तो पणजी स्पोर्टस् सेंटर या प्रमुख क्लबसाठी खेळत आहे. या संघाने गोव्यात एक मजबूत स्थान निर्माण केले आहे. कबड्डीतील कामगिरीसाठी त्याला गोवा कबड्डी संघटनेची मदत लाभली आहे. संघटनेच्या अध्यक्ष रुक्मिणी कामत व आश्रयदाते दत्ताराम कामत यांचे त्याला सदोदीत मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे.
नोकरी, शेती सांभाळून सराव
रामा आपल्या खेळाच्या आवडीसाठी नियमित सराव करीत आहे. त्याचबरोबर नोकरी सांभाळून आपल्या शेतातही राबत आहे. त्यात भात, भाजीचे पिक घेण्यासाठी वडील कृष्णा व आई राजश्री यांना बहुमूल्य मदत करीत आहे. त्याला एक विवाहित बहीण असून धाकटाभाऊ पणजी येथील डॉन बॉस्को महाविद्यालयात बी.पी.एडचे शिक्षण घेत आहे. यापुढे पूर्णवेळ शेतीसाठी काम करण्याचे त्याने ठरविले आहे.
कबड्डीमुळे ओळख निर्माण झाली
कबड्डीमुळे आपली ओळख निर्माण झाली आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळू लागल्याने आपल्याला नावलौकिक मिळाला, असे रामा सांगतो. कबड्डी हा एक उत्कृष्ट खेळ असून खेळामुळे लवचिकता, चपळता व मजबूत शरीर लाभते. ग्रामीण भागात हा खेळ टिकून आहे. या खेळात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचे त्याने सांगितले. प्रो- कबड्डी व भारतीय संघातही खेळण्याचे त्याचे स्वप्न असून त्या दृष्टीने आपण तयारी करीत आहे. शेती सांभाळून तो कबड्डीची ‘पॅशन’ जपणार आहे.