For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा!

03:02 PM Apr 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा
Advertisement

मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार : डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत गौरव‘ प्रदान

Advertisement

पणजी : विश्वाच्या नभांगणात तळपणारा गोमंतकीय तारा म्हणजे महान शास्त्रज्ञ प्रा. डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत, याचा माझ्यासह सर्व गोमंतकीयांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले. विज्ञान-तंत्रज्ञान, नवोपक्रम, राष्ट्रनिर्मिती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये अनन्यसाधारण योगदान देणारे जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. माशेलकर यांना ‘गोमंत गौरव’ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ते बोलत होते.

कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर त्यांच्यासोबत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, जीसीसीआयच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड, उपाध्यक्ष यतीन काकोडकर, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे डॉ. राहूल कराड, उपकुलगुरू डॉ. वॉल्टर लुई, संजय आमोणकर, डॉ. आदिती कराड आणि प्रसाद खाडीलकर यांची उपस्थिती होती. जीसीसीआय आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांनी संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Advertisement

विश्वाचे नभांगण व्यापून टाकले

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, माशेलसारख्या लहानशा गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले डॉ. माशेलकर यांनी आपल्या आईच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी जी गऊडभरारी घेतली त्यातून त्यांनी विश्वाचे नभांगण व्यापून टाकले. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन उपक्रमांचा धडाका लावतांना त्यांनी ‘डॉक्टरेट“ मिळविण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे हे कार्य प्रत्येक गोमंतकीयाबरोबरच संपूर्ण देश आणि जगासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रशंसोद्गार काढले.

एका दिवसासाठी तरी मला परत पृथ्वीवर पाठव...

गोव्यासाठी ‘व्हीजन 2035’ डॉक्युमेंट तयार करण्याची जबाबदारी तत्कालीन सरकारने  माझ्यावर सोपविली. त्याची फलश्रृती भविष्यात दिसून येणारच आहे. परंतु आज माझे वय 80 च्या पार गेलेले आहे. त्यामुळे वर्ष 2035 माझ्यासाठी फार दूर आहे. अशावेळी मी गेलो तरीही ‘2035 मधील गोवा पाहण्यासाठी’ मला केवळ एका दिवसासाठी पृथ्वीवर पाठव अशी प्रार्थना देवाजवळ करेन, असे उद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले व चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला.

अन् माशेलकर झाले भाऊक...

  • आपल्या मातृभूमीत झालेल्या सन्मानाला उत्तर देताना डॉ. माशेलकर यांनी आज आपण जीवनात जे काही मिळविले आहे ते केवळ आणि केवळ आईमुळेच असल्याचे भावोद्गार काढले.
  • आजचा हा सन्मान आईच्या स्मृतींना समर्पित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या या विनम्र घोषणेचे स्वागत केले. हा क्षण संस्मरणीय ठरला.
  • आज आपण एवढा भावूक झालेलो आहे की, शब्दांची कमी नसली तरीही याक्षणी काय बोलावे तेच सूचत नाही, असेही माशेलकर म्हणाले.
  • कला अकादमीच्या या सभागृहात जादुई शक्ती आहे याची वेळोवेळी प्रचिती आलेली आहे. जगभरातील अनेक सभागृहे आणि व्यासपीठे पाहिली, परंतु जेव्हा जेव्हा मी या सभागृहात उभा राहतो तेव्हा प्रत्येकवेळी काहीतरी वेगळेपणा जाणवतो.
  • लोकांचे मला सदैव आशीर्वाद मिळत राहतात आणि त्या ‘गुडविल कॅपिटल“ बाबत मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, असे उद्गार डॉ. माशेलकर यांनी काढले.

माऊलीने अपार कष्ट घेतले

शिक्षण नसल्यामुळे माझ्या आईला समाजाकडून अनेकदा अपमान सहन करावा लागला. तसे अपमान माझ्या वाट्याला येऊ नयेत असा निर्धार करून त्या माऊलीने अपार कष्ट घेऊन मला शिक्षण दिले. म्हणूनच आज मी जो कोणी आहे तो केवळ आईमुळे असल्याचे त्यांनी सांगितले. 2035 पर्यंत गोवा सुरम्य, संतुलित, सुविध्य, समृद्ध, सुशासित, स्वानंदी झालेला मला पहायचा आहे, अशी मनिषा त्यांनी व्यक्त केली.

मंत्री गुदिन्हो यांनी बोलताना सांगितले की, जगातील हजारो लोकांचे प्रेरणास्थान असले तरीही त्याचा कुठेही बडेजाव, अहंकार न मिरवता जमिनीवर पाय ठेऊन वावरणारे व अत्यंत नम्रतेचे आणि साधे जीवन जगणारे व्यक्तीमत्व म्हणजे डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत. त्यांच्या या साधेपणाचा आम्हा सर्व गोमंतकीयांना अभिमान आहे, असे उद्गार काढले. डॉ. माशेलकर यांची एका वाक्यात ओळख म्हणजे ते ‘ग्लोबल सन ऑफ गोवा“ आहेत, असेही गुदिन्हो यांनी नमूद केले.

जीसीसीआयच्या अध्यक्ष प्रतिमा धोंड यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ड़ॉ. माशेलकर यांच्या जीवनावर आधारित विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर डॉ. माशेलकर यांनी लिहिलेल्या व सध्या देशभरात सर्वाधिक मागणी असलेल्या ‘मोअर फ्रॉम लॅस, फॉर मोअर“ या पुस्तकाच्या प्रती व्यासपीठावरील मान्यवरांसह प्रत्येक चाहता आणि प्रेक्षकांनाही भेट देण्यात आल्या. याच कार्यक्रमात जीसीसीआय आणि एमआयटी यांच्यात वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीसंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. प्रो. बापट यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.