येडियुराप्पा रोडवर साडेतीन लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त
बेळगाव : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई करून महाद्वार रोडवरील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मंजुनाथ मलगौडा गिडगेरी (वय 26) असे त्याचे नाव असून त्याच्याकडून कारसह सुमारे 3 लाख 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवार दि. 8 रोजी येडियुराप्पा रोडवर अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. जीए 09 ए 3810 या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जाणार आहे, अशी खात्रीलायक माहिती अबकारी खात्याचे उपअधीक्षक रवी मुरगोड यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येडियुराप्पा रोडवर सापळा रचून कारगाडी थांबून झाडाझडती घेतली. त्यावेळी कारमध्ये एकूण 138.60 लिटर गोवा बनावटीची दारू असलेले सहा बॉक्स आढळून आले. संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारमालकाचा शोध चालविण्यात आला आहे. सदर कारवाईत रेंज 3 चे अबकारी निरीक्षक सुनीलकुमार डी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.