बांद्यात गोवा बनावटीचा लाखोंचा दारूसाठा जप्त
प्रतिनिधी
बांदा
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीवर बांदा पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीचा सुमारे ३ लाख ६९ हजार ६०० रुपये किमतीचा दारूसाठा आणि ५ लाख रुपये किमतीची गाडी असा एकूण ८ लाख ६९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. मोडनिंब पाटोळे वस्ती, बैरागवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि राम नागनाथ माने (वय ३५, रा. मुक्काम पोस्ट- आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोन आरोपींना अटक करून बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे मिनिटांच्या सुमारास विलवडे येथील शिवाजी पुतळा येथे केली.याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा दाणोली मार्गावर नाकाबंदी दरम्यान तपासणी सुरू असताना, पोलीस पथकाला पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीतून (क्र. एमएच ४२ बीएफ ८२३४) गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे आढळून आले.या कारवाईत पोलिसांनी खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ७५० मिली मापाच्या एकूण १२० बॉक्समधील १३२० प्लॅस्टिक बाटल्यांचा दारूसाठा जप्त केला. या दारू साठ्याची किंमत ३ लाख ६९ हजार ६०० रुपये इतकी आहे. तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीही जप्त करण्यात आली.पोलीस हवालदार विठ्ठल सखाराम खरात यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पो. हवालदार राजेश गवस, पो. हवालदार दादा परब आणि पो. कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांच्या पथकाने केली.