रत्न-दागिन्यांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सची करण्याचे ध्येय
वर्ष 2040 पर्यंत हे ध्येय प्राप्त करण्याचे संकेत : केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या देखरेखीखाली नवा थिंक टँक तयार करण्यात आला आहे. सरकारने 2040 पर्यंत भारतीय रत्न आणि दागिन्यांची निर्यात 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बैठकीदरम्यान, भारताची उत्पादन क्षमता मजबूत करणे, बाजारपेठेत प्रवेश वाढवणे आणि ‘क्राफ्टेड इन इंडिया“ दागिन्यांना जागतिक ओळख मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. 2025-26 मध्ये भारताची रत्न आणि दागिन्यांची निर्यात 28 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सरकारी अंदाजानुसार, 2040 पर्यंत हे क्षेत्र भारताच्या जीडीपीमध्ये 1.2 टक्के आणि देशाच्या एकूण वस्तूंच्या निर्यातीत 14 टक्के योगदान देणार असल्याची अपेक्षा आहे.
भारताची खरी ताकद येथील कारागीर
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, भारताच्या रत्न आणि दागिने क्षेत्राला सुमारे 28 अब्ज डॉलर्सवरून 100 अब्ज डॉलर्सपर्यंत (100 बिलियन डॉलर्स) नेणे हा मुख्य उद्देश आहे. भारताची खरी ताकद सोने, चांदी किंवा कच्च्या हिऱ्यांच्या खाणींमध्ये नाही, तर देशातील कुशल कारागिरांच्या मोठ्या समूहात आहे. केवळ मूलभूत उत्पादनापेक्षा डिझाइन, नावीन्य आणि जागतिक ब्रँडिंगमधून अधिक फायदा होईल.
पुरवठा वाढवण्यासाठी एआयचा वापर
विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनानुसार, एक मजबूत पुरवठा साखळी आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त भारतीय ब्रँड्स तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि 3डी प्रिंटिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. त्यांनी जोखीम पत्करण्याची क्षमता वाढवणे, भविष्यातील औद्योगिक आव्हानांना सामोरे जाणे आणि तरुण प्रतिभावंतांना मार्गदर्शन करण्याबद्दलही सांगितले. डीजीएफटीचे महासंचालक लव अग्रवाल म्हणाले की, भारताने जागतिक रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात आधीच एक मजबूत स्थान निर्माण केले आहे व आता मूल्य साखळीत (व्हॅल्यू चेन) आणखी वर जाण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची गरज आहे.
मुक्त व्यापार कराराचा लाभ
जीजेईपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साली म्हणाले की, भारतातील रत्न आणि दागिने उद्योग सध्या एका महत्त्वपूर्ण वळणावर आहे. नवीन मुक्त व्यापार करार, विशेष अधिसूचित क्षेत्रांमार्फत कच्च्या हिऱ्यांच्या विक्रीवरील 15 वर्षांची करमाफी आणि एमएसएमई क्षेत्राला दिलेला भक्कम पाठिंबा यामुळे या उद्योगाच्या वाढीसाठी एक मजबूत धोरणात्मक पाया तयार झाला आहे.
रत्न-दागिन्यांच्या निर्यातीत सुधारणा
जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने प्रसिद्ध केलेल्या एप्रिल-जुलैच्या निर्यात आकडेवारीनुसार, निर्यात 2.44 टक्क्यांनी वाढून 9.17 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. भारतीय रुपयांमध्ये निर्यात 13.58 टक्क्यांनी वाढून 87,078.01 कोटी रुपयांवर पोहोचली. दागिन्यांच्या विक्रीत सुमारे 21 टक्क्यांची वाढ झाली. जीजेइपीसीचे अध्यक्ष किरीट भन्साली म्हणाले की, ‘प्रतिकूल आंतरराष्ट्रीय परिस्थिती असूनही भारतीय रत्न आणि दागिन्यांची निर्यात वाढतच आहे. भारतीय निर्यातदारांनी चांदीचे दागिने आणि प्लॅटिनमचे दागिने यांसारख्या मूल्यवर्धित विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.