कर्नाटकात जाऊन गोवा करणार म्हादईची पाहणी
गोवा विधानसभा सभागृह समितीच्या बैठकीत निर्णय : पाणी वळवण्यासाठी बांधकामे होत असल्याचे वृत्त
पणजी : कर्नाटकात म्हादई नदीवर पाणी वळवण्यासाठी खरोखरच बांधकामे झालीय की नाही ? याची तेथे जाऊन पाहणी करण्याचा निर्णय गोवा विधानसभेच्या सभागृह समितीने घेतला आहे. म्हादईच्या प्रश्नावर पुढील कृती ठरवण्यासाठी दोन वर्षापूर्वी राज्य विधानसभेत सभागृह समिती नेमण्यात आली होती. अनेक दिवसानंतर काही सदस्यांनी मागणी केल्यामुळे काल बुधवारी सदर समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली.
सत्य जाणण्यासाठी पाहणी आवश्यक
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे समितीचे प्रमुख असून त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. म्हादईचे पाणी वळवले तसेच त्यासाठी बांधकामे होत आहेत, अशा आशयाच्या विविध बातम्या वृत्तपत्रांमधून सातत्याने येत असल्यामुळे नेमके सत्य काय आहे ते शोधून काढण्यासाठी तेथे भेट देण्याचे एकमताने बैठकीत ठरवण्यात आले.
कर्नाटक सभापतींना पाठवावे पत्र
झालेल्या निर्णयानुसार सभागृह समिती सभापती रमेश तवडकर यांना पत्र देणार असून त्यांनी कर्नाटकाच्या सभापतींना पत्र पाठवून या म्हादई पाहणीसाठी अनुमती घ्यावी, आणि मग तेथे जावे असे निश्चित करण्यात आले आहे. आता अशा प्रकारे पत्र पाठवून कर्नाटकाचे सभापती पाहणी करण्यासाठी अनुमती देतील की नाही हा प्रश्नच आहे.
प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित
कर्नाटकात म्हादई नदीवर नेमके काय चालू आहे याची खरी माहिती कोणालाच नाही. ‘प्रवाह’ कडे त्याबाबत मागणी गोवा सरकारतर्फे करण्यात आली होती. परंतु ती पूर्ण झाली नसल्याचे काहीजणांनी सांगितले. म्हादईचा पाणी वाटप प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून तो कधी सुनावणीसाठी येईल ते सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. प्रत्येक महिन्यात किंवा दोन महिन्यातून एकदा तरी बैठक व्हावी अशी मागणी बैठकीतून झाली आहे.