For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोवा लवकरच 100 टक्के साक्षर

12:29 PM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोवा लवकरच 100 टक्के साक्षर
Advertisement

एससीईआरटी अन् शिक्षण संचालनालयाच्या विद्यमाने ‘उल्लास मेळा’

Advertisement

पणजी : सध्या गोव्याच्या साक्षरतेची टक्केवारी 94 टक्क्यांवर आलेली आहे. भविष्यात म्हणजे येत्या 30 मे ह्या घटकराज्य दिनापर्यंत गोवा राज्याला 100 टक्के साक्षर बनविण्याचा निर्धार सरकारने केला आहे. राज्यातील कामगार आणि ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही, अशी मुले यांची संख्या 6 टक्के आहे. त्यांना लवकरच मदत पुरवून संपूर्ण गोवा साक्षर केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीत 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ‘उल्लास मेळा 2025’ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. हा कार्यक्रम एससीईआरटी आणि शिक्षण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, नियोजन सांख्यिकी आणि मूल्यांकन विभागाचे संचालक विजय सक्सेना, शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगडे, एससीईआरटीच्या संचालिका मेघना शेटगावकर, प्रशासन विभाग एससीआरटीच्या संचालिका सरिता गाडगीळ, जीईडीसीचे अध्यक्ष गोविंद पर्वतकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

केंद्र सरकारने ‘नवभारत साक्षरता अभियान’ सुरू केले असून, हे अभियान 2027 सालापर्यंत चालणार आहे. या अभियानाचा फायदा घेत गोव्याने देशात आदर्श निर्माण केलेला आहे. त्यामुळे गोव्याच्या साक्षरतेत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या 94 टक्के साक्षरता असून, उर्वरित 6 टक्के येत्या घटकराज्य दिनापर्यंत पूर्ण होऊन गोवा राज्य हे 100 टक्के साक्षर झालेले असेल, असा विश्वासही मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला. ‘उल्लास मेळा 2025’ या कार्यक्रमात नवभारत साक्षर अभियानाच्या माध्यमातून नवशिक्षितांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या निवडक दहा व्यक्तींना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच नवशिक्षितांना शिकविणाऱ्या स्वयंसेवक शिक्षकांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.

लोक संस्कृतीचे अनोखे दर्शन

‘उल्लास मेळा 2025’ या कार्यक्रमात ‘नवभारत साक्षर’ अभियनाद्वारे ‘गोंय आमचें भांगराचे’ म्हणत गोमंतकीय लोकसंस्कृतीचे अनोखे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षण ठरला. नवशिक्षितांनी सादर केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थितांकडून वाहवा मिळाली. नवसाक्षरांना शिकविण्यासाठी अध्यापकांना उपयुक्त असलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलेले होते.

Advertisement
Tags :

.