गोव्याला मिळणार आणखी 500 इलेक्ट्रिक बसेस
आयआयटी विद्यार्थ्यांचा ‘सीएसआर’ उपक्रम
पणजी : राज्याला शाश्वत वाहतूक व्यवस्थेची गरज असून आयआयटी विद्यार्थी मंडळाने आपल्या सामाजिक व्यावसायिक जबाबदारीचा (सीएसआर) भाग म्हणून राबविलेल्या उपक्रमातून गोव्याची ही गरज भागणार आहे. त्यासाठी आयआयटी विद्यार्थी मंडळाकडून तब्बल 500 इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. त्यावर सुमारे 700 कोटी ऊपये खर्च येणार आहे. त्याद्वारे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. काल बुधवारी पर्वरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्य सचिव पुनितकुमार गोयल यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. त्यांनीच आयआयटी मंडळाकडे त्यांच्या सीएसआर निधीतून इलेक्ट्रिक बसेस मिळवून देण्याची मागणी केली होती. तिला सकारात्मक प्रतिसाद देताना आयआयटी विद्यार्थी मंडळाने गोव्याला 500 इलेक्ट्रिक बसेस देण्याची तयारी दाखवली आहे. सध्या या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. लवकरच या बसेस राज्यात दाखल होतील. त्यानंतर त्यांचे वाटप करण्यात येईल.