जैव संवेदनशीलतेत गोवा ठरणार अग्रेसर
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : राज्याकडून केंद्र सरकारच्या सर्व योजनांची 100 टक्के अंमलबजावणी
पणजी : जैव संवेदनशील विभागांचा आराखडा बनविणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या सर्व योजनांची 100 टक्के अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणूनही गोव्याला मान प्राप्त झाला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. शुक्रवारी पणजीत आयोजित विभागीय ग्रामीण कार्यशाळेत ते बोलत होते. त्यावेळी केद्रीय ग्रामीण विकास आणि संपर्क राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर, क्रीडामंत्री गोविंद गावडे, मुख्य सचिव व्ही. कंदवेलू यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, जैव संवेदनशील विभागांचा आराखडा बनविण्यात येत असून लवकरच तो केंद्र सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासात पर्यावरणाचा समतोल राखत, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. जैव संवेदनशील विभाग आराखड्याच्या माध्यमातून आम्ही पर्यावरण संवेदनशील विभागांचे संरक्षण आणि विकास साधण्याचे ध्येय ठेवले आहे. या आराखड्याला लवकरच अंतिम रूप देऊन केंद्र सरकारकडे पाठवले जाईल, असे सांगितले.
राज्य सरकारच्या पुढाकारामुळे पर्यावरणाचा समतोल राखत सर्वसमावेशक विकासाचा मार्ग मोकळा होणार असून गरजू वर्गाचेही घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने गोरगरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी हाती घेतलेल्या गृहयोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांनाही यापुढे गोव्यात पक्की घरे मिळावी यासाठी विशेष योजनांची आखणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसाचे स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.