पावसाने पुन्हा झोडपले
पणजी : बुधवारी सायंकाळी उशिरा गोव्याच्या विविध भागाला रात्रभर पावसाने झोडपून काढले आणि दिवसभरात पावणे तीन इंच पावसाची नोंद झाली. यामुळे मान्सूनपूर्व पावसाची एकंदरीत नोंद आता 25 इंच झाली आहे. आज गोव्यात येलो अलर्ट असून या दरम्यान अधूनमधून मुसळधार पाऊस पडून जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील दोन-तीन दिवसात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील. गेल्या 24 तासात गोव्याच्या विविध भागाला विशेषत: दक्षिण गोव्यामध्ये मुसळधार वृष्टी झाली. उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण फार मर्यादित आहे. विशेषत: वाळपई आणि सांखळी या भागात पावसाचे प्रमाण मर्यादित राहिले. दिवसभर केपे, सांगे, काणकोण, मडगाव इत्यादी भागात जोरदार पाऊस कोसळला. केपे येथे सुमारे सात इंच पावसाची नोंद झाली, तर सांगेमध्ये पाच पूर्णांक पाच इंच पाऊस कोसळला.
काणकोण येथे साडेचार इंच, मडगावात चार इंच तर पणजीमध्ये पावणे चार इंच पाऊस कोसळला. म्हापसा अडीच इंच, जुने गोवेत सव्वा दोन इंच, दाभोळी व मुरगाव प्रत्येकी दोन इंच, फोंडा दीड इंच, पेडणे दीड इंच व साखळी पाऊण इंच पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने आज येलो अलर्ट जारी केला असून उद्या 31 रोजी ग्रीन अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल. 1 आणि 2 रोजी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज धरून पुन्हा दोन दिवसांकरिता येलो अलर्ट जारी केला आहे. यंदाच्या मोसमपूर्व पावसाची नोंद 25 इंच झाली असून आतापर्यंतचा हा गोव्याच्या इतिहासातील पहिलाच रेकॉर्ड ठरावा. दरवर्षी या दरम्यान केवळ सव्वा दोन इंच पावसाची नोंद होत असते यंदा पडलेला पाऊस लक्षात घेता ही टक्केवारी 1008 टक्क्यांनी ने वाढलेली आहे. गोव्यातील बहुतांश धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. आगामी 24 तासात गोव्यात सर्वत्र जोरदार सरी कोसळतील. त्याचबरोबर समुद्र खवळलेला आहे. वाऱ्याचा वेग ताशी 55 किलोमीटर प्रमाणे राहील. त्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.