गोव्याच्या भाजीपाल्याची बेळगाव बाजारपेठेत भरारी; चार वर्षांत 16.20 लाख किलो निर्यात
पणजी : त. भा. संदीप कांबळे
गोव्याच्या कृषी क्षेत्राने गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रगती केली असून, स्थानिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला आता थेट शेजारील कर्नाटकातील बेळगावच्या बाजारपेठेत पाठवला जात आहे. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाच्या आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांत गोव्यातील तब्बल 16.20 लाख किलो (1,620 टन) भाजीपाला बेळगावच्या बाजारपेठेत पाठवण्यात आला आहे.
भाजीपाल्यासाठी वर्षानुवर्षे शेजारील राज्यांवर अवलंबून असलेल्या गोव्यात स्थानिक उत्पादनात वाढ होत आहे. सत्तरी, सांगे, केपे, डिचोली आणि फोंडा या तालुक्यांमध्ये भाजीपाला उत्पादनाला विशेष चालना मिळाली आहे. राज्य सरकारच्या विविध कृषी योजना व अनुदानांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी मिरची, भेंडी, पडवळ, कारली, तांबडी भाजी यांसह विविध स्थानिक भाज्यांचे उत्पादन वाढवले आहे.
गोव्यातील स्थानिक मागणी पूर्ण केल्यानंतर उर्वरित भाजीपाला बेळगाव येथील प्रमुख घाऊक बाजारपेठेत पाठवला जात आहे. त्यामुळे गोव्यातील शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेबरोबरच शेजारील राज्यातील बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या चार वर्षांतील ही निर्यात गोव्याच्या कृषी क्षेत्रातील बदलाचे द्योतक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळणाऱ्या कृषी अनुदानामुळे स्थानिक उत्पादनाला चालना मिळाली आहे. यामुळे भाजीपाल्याची बाहेरून होणारी आवक कमी करण्यास मदत होत असून, गोवा कृषी क्षेत्रात स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहे.
पूर्वी गोव्यात विक्रीसाठी येणाऱ्या भाजीपाल्यापैकी 90 टक्के भाजीपाला बेळगावातून येत असल्याचे सांगितले जाते. मात्र, गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला खरेदी सुरू केल्याने त्यांना निश्चित बाजारपेठ आणि उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे. आता गोव्यातील ताजा भाजीपाला बेळगावच्या बाजारपेठेतही पोहोचत आहे.
‘हा गोव्याच्या बळीराजाचा विजय’
गोवा भाजीपाल्यासाठी परावलंबी राहू नये, हे सरकारचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. गोवा पूर्वी भाजीपाल्यासाठी परावलंबी होता; मात्र आता राज्यातील शेतकरी भाजीपाला बाहेरच्या बाजारपेठेत पाठवत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. शेतकऱ्यांचे कष्ट आणि सरकारच्या कृषी धोरणांचे हे यश असून, भविष्यात गोवा कृषी क्षेत्रात आणखी प्रगती करेल, असेही त्यांनी नमूद केले.