ई-चलनाच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; बनावट पेमेंट लिंकपासून सावध राहण्याचे गोवा वाहतूक खात्याचे आवाहन
वाहतूक खात्याने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार, सध्या फिशिंग संदेश आणि सरकारी सेवा असल्याचे भासवणाऱ्या बनावट लिंक्सच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. वाहनचालकांना एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा अन्य माध्यमांतून ई-चलन भरण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
वाहतूक संचालनालय आणि गोवा पोलीस मोटार वाहन कायदा, 1988 तसेच केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना इलेक्ट्रॉनिक चलन जारी करतात. या ई-चलनाची तपासणी आणि भरणा करण्यासाठी विभागाने तीन अधिकृत माध्यमे निश्चित केली आहेत.
वाहनचालकांनी अनोळखी संदेशांमधील लिंकवर अवलंबून न राहता संबंधित अधिकृत वेबसाइट स्वतंत्रपणे उघडून ई-चलनाची माहिती तपासावी आणि त्यानंतरच पैसे भरावेत, असे आवाहन विभागाने केले आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सतर्कता बाळगून आर्थिक फसवणूक टाळावी, असेही वाहतूक संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
