दाबोळीवर पहिले चार्टर विमान दाखल; 163 रशियन पर्यटकांचे स्वागत
वास्को : यंदाच्या पर्यटन हंगामाला बुधवारी दाबोळी विमानतळावरून अधिकृत सुरुवात झाली. रशियातून आलेले हंगामातील पहिले चार्टर विमान सकाळी दाबोळी विमानतळावर दाखल झाले. या विमानातून 163 रशियन पर्यटक गोव्यात आले.
दाबोळी विमानतळावर या पर्यटकांचे भारतीय पद्धतीने पारंपरिक स्वागत करण्यात आले. यावेळी संगीताचीही साथ लाभली. राज्याचे शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत केक कापून चार्टर पर्यटन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी दाबोळी विमानतळाचे संचालक आकाश दीप, विमानतळाचे अधिकारी तसेच पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. चार्टर विमानातून गोव्यात दाखल झालेल्या पर्यटकांचे स्वागत करताना दाबोळी विमानतळ हे गोव्याची संस्कृती आणि आदरातिथ्य जगासमोर मांडणारे प्रवेशद्वार असल्याचे आकाश दीप यांनी सांगितले.
चार्टर पर्यटन हंगाम मार्च 2027 पर्यंत सुरू राहणार असून, यंदाच्या हंगामात चार्टर विमानांतून सुमारे 26 हजार विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. वाढणारी विमानांची संख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन दाबोळी विमानतळावर आवश्यक त्या सर्व सुविधा आणि व्यवस्था सज्ज ठेवण्यात आल्याचेही दीप यांनी स्पष्ट केले.