गोव्यातील कयाकिंग पॉइंट्सचे नियमन होणार; 7-8 दिवसांत सीमांकन
पणजी : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्याच्या अंतर्गत भागातील कयाकिंग केंद्रांचे सीमांकन करून त्यांचे नियमन करण्यात येणार आहे. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी याबाबत माहिती देताना, पुढील 7 ते 8 दिवसांत कयाकिंग पॉइंट्स निश्चित करून त्यांना नियमनाच्या चौकटीत आणले जाईल, असे सांगितले.
उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच कयाकिंगच्या व्यावसायिक आणि पर्यटनविषयक उपक्रमांना परवानगी देण्याच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे.
गोवा सरकारच्या ‘बियॉन्ड बीचेस’ या पर्यटन संकल्पनेअंतर्गत राज्यातील समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त अंतर्गत भागातील पर्यटनस्थळांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामध्ये कयाकिंगसह हिंटरलँड पर्यटन, खाद्यसंस्कृती, वेलनेस, साहसी पर्यटन, आयुर्वेद, योग आणि आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.
कयाकिंग पॉइंट्सचे सीमांकन आणि नियमन झाल्यानंतर या उपक्रमांना अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटकांना सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने साहसी पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे.