गोव्यात खाणकामाला चालना देणार; पर्यावरण संरक्षणालाही प्राधान्य : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
या परिषदेला केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे तसेच विविध राज्यांचे खाणमंत्री उपस्थित होते.
परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते महत्त्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये क्रिटिकल मिनरल्स लिलावाची नववी फेरी, एक्सप्लोरेशन लायसन्स ब्लॉक्सची तिसरी फेरी, एमआयडीपीएएस-एकम (MIDPAS-EKAM) मोबाईल अॅप आणि अन्वेष खाण विश्लेषण डॅशबोर्ड (ANVESH Mining Analytics Dashboard) यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, गोवा राज्य सूर्य, समुद्रकिनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असले, तरी खाण व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार राहिला आहे. या व्यवसायामुळे हजारो कुटुंबांना रोजगार आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध झाले आहे.
केंद्र सरकारकडून खाण क्षेत्रात पारदर्शक लिलाव प्रक्रिया, तंत्रज्ञानाचा वापर आणि सुधारित प्रशासन व्यवस्थेद्वारे करण्यात येणाऱ्या सुधारणांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. खनिज संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि खाण क्षेत्राचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांमधील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारताच्या औद्योगिक विकासासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्रिटिकल मिनरल्सच्या शोध व विकासाला चालना देणाऱ्या उपक्रमांचेही त्यांनी स्वागत केले.
या परिषदेत विविध राज्यांच्या खाणमंत्र्यांनी खाण व कोळसा क्षेत्रातील सुधारणा, तंत्रज्ञानविषयक नवकल्पना आणि पारदर्शकता वाढविणाऱ्या धोरणात्मक उपाययोजनांवर चर्चा केली. आर्थिक विकास, पर्यावरण संरक्षण आणि खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक समुदायांचे हित यांचा समतोल राखत खाण क्षेत्रातील सुधारणांमध्ये योगदान देण्याची गोव्याची बांधिलकी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुन्हा अधोरेखित केली.