For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटी अंदाजित लोकसंख्येची अधिसूचना स्थगित, मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा; संबंधित पक्षांना १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत

09:05 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसटी अंदाजित लोकसंख्येची अधिसूचना स्थगित  मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा  संबंधित पक्षांना १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत
Advertisement

पणजी : गोव्यातील अनुसूचित जमातींच्या (एसटी) अंदाजित लोकसंख्येबाबतची अधिसूचना स्थगित ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने गुरुवारी दिला आहे. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अंतरिम दिलासा देताना, गोव्यातील विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाच्या पुनर्रचनेशी संबंधित 'गोवा विधानसभा मतदारसंघांमधील अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचे पुनर्रचना अधिनियम, २०२५' च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच, न्यायालयाने संबंधित पक्षांना १९ नोव्हेंबरपर्यंत आपली उत्तरे आणि प्रत्युत्तरे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

गोव्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव जागांची तरतूद करण्यासाठी लोकसभेने विधेयक मंजूर केल्यानंतर, ६ ऑगस्ट २०२६ रोजी हा कायदा लागू झाला होता. याचिकाकर्ते एडविन फर्नांडिस यांचे वकिल नौशाद इंजिनियर यांनी उच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की, एसटी राखीव जागांची तरतूद करण्यासाठी राज्य सरकारकडे ठोस माहितीचा अभाव आहे.

आदिवासी लोकसंख्या निश्चित करण्यासाठी सरकारकडे असलेली आकडेवारी जुनी असून ती सध्या कालबाह्य ठरली आहे. याबाबतचे निकष एकतर २००१ च्या जनगणनेतील प्रकाशित आकडेवारीवर आधारित असावेत किंवा २०२६ च्या जनगणनेनंतर (ज्याचे काम आधीच सुरू झाले आहे) प्रकाशित होणाऱ्या आकडेवारीवर आधारित असावेत. त्यामुळे आदिवासी लोकसंख्या निश्चित करण्यासाठी सरकारने तातडीची घाई करू नये.

Advertisement

कायदा संविधानाच्या विरोधात
अॅड. नौशाद इंजिनियर यांनी पुढे युक्तिवाद केला की, हा कायदा भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या विरोधात आहे. राज्यघटनेच्या कलम ३३० आणि ३३२ नुसार, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जमातींची लोकसंख्या निश्चित करण्यासाठी काही विशिष्ट निकष असणे आवश्यक आहे.

आव्हान देता येत नाही
कायद्याच्या कलम ३ च्या उप-कलम ४ अन्वये, जर अशी अधिसूचना जारी केली गेली, तर ती अंतिम ठरते आणि कोणत्याही न्यायालयात तिला आव्हान देता येत नाही. याच पार्श्वभूमीवर याचिकाकर्त्याने अंतरिम दिलासा मिळवण्यासाठी न्यायालयाकडे आग्रह धरला. याच युक्तिवादातील मुद्दे न्यायालयाने मान्य केले.

पुनर्रचनेनुसार आरक्षणाची मागणी
गोव्यातील कुणबी, गावडा आणि वेळीप या तीन समुदायांना 'अनुसूचित जमाती आयोगाद्वारे 'अनुसूचित जमाती' म्हणून घोषित केल्यानंतर, संबंधित याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे अशी मागणी केली होती की, विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी आरक्षण लागू करण्यासाठी पुन्हा एकदा मतदारसंघांची पुनर्रचना केली जावी आणि अतिरिक्त जागा राखीव ठेवल्या जाव्यात.

न्यायालयाने स्पष्टपणे केले नमूद
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १७० आणि ३३२ मध्ये तरतूद केल्यानुसार, २०२६ नंतर होणारी पहिली जनगणना पूर्ण होईपर्यंत मतदारसंघांची पुनर्रचना किंवा आरक्षणात कोणताही बदल करता येणार नाही. २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी सीमांकन प्रक्रिया राबवण्याचा कोणताही प्रयत्न करणे अनुज्ञेय नाही. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला अंतरिम दिलासा देत आपल्या ३१ पानी निकालात गोव्यातील अनुसूचित जमातींच्या अंदाजित लोकसंख्येबाबतची अधिसूचना जारी करण्यावर स्थगिती दिली आहे.

२०२६ ची जनगणना पूर्ण होईपर्यंत सीमांकन नाही
गोवा राज्यातील २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातींचे प्रमाण ९.९ टक्के होते आणि आजच्या तारखेलाही हे प्रमाण साधारणपणे तितकेच असावे, असे तर्कसंगतपणे गृहीत धरले गेले होते. मात्र, त्यासाठी कोणत्याही आधार किंवा आकडेवारीशिवाय, असे 'गृहीत' धरून पुढे पावले उचलण्यात आली असल्याचा दावा न्यायालयाने उचलून धरला. या निकालात हे देखील स्पष्टपणे नमूद केले आहे की, कलम १७० (३) आणि कलम ३३२ यांच्या एकत्रित वाचनानुसार, २०२६ नंतर होणारी पुढील जनगणना पूर्ण होईपर्यंत गोवा राज्यात 'सीमांकन कायदा, २००२' अंतर्गत कोणतीही नवीन सीमांकन प्रक्रिया किंवा अधिकारांचा वापर करण्यास परवानगी नाही.

जनगणना आयोगाच्या कारभारावर नाराजी
खंडपीठाने जनगणना आयुक्तांना याद्वारे प्रतिबंध करताना, त्यांनी १० सप्टेंबर २०२६ रोजी कायदा व न्याय मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केलेली आकडेवारी 'गॅझेट ऑफ इंडिया' मध्ये अधिसूचित करू नये. तसेच २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणने व्यतिरिक्त इतर कोणत्याही आधारावर निश्चित केलेली किंवा अंदाजित केलेली लोकसंख्येची कोणतीही आकडेवारी अधिसूचित करू नये. २००२ च्या किंवा २०११ च्या जनगणनेच्या आधारे, गोव्यातील अनुसूचित जमातींची सध्याची लोकसंख्या किती आहे, याचा अंदाज वर्तवण्यास किंवा ती निश्चित करण्यास जनगणना आयुक्त असमर्थ आहेत. जनगणना आयुक्तांची राज्यातील लोकसंख्या निश्चित करण्याची किंवा तिचा अंदाज वर्तवण्याची प्रक्रिया पूर्णपणे मनमानी स्वरूपाची असल्याचा शेरा न्यायालयाने मारला आहे.

Advertisement
Tags :

.