For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एसटी राजकीय आरक्षणासाठी गोवा सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

11:28 PM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसटी राजकीय आरक्षणासाठी गोवा सरकार सुप्रीम कोर्टात जाणार  मुख्यमंत्री डॉ  प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
Advertisement
पणजी : गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीच्या (ST) बांधवांना राजकीय आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला गोवा विधानसभा अध्यक्ष डॉ. गणेश गावकर, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर, महाधिवक्ता देविदास पांगम, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, अॅड. नरेंद्र सावईकर यांच्यासह एसटी समाजाचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Advertisement

बैठकीत उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे कायदेशीर परिणाम आणि एसटी समाजाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेऊन आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच नवी दिल्लीला जाणार आहे. तेथे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याशी चर्चा करून सर्वोच्च न्यायालयातील पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबत मार्गदर्शन घेतले जाणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एसटी समाजाला गोवा विधानसभेत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ही मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित असून, केंद्र सरकारच्या सहकार्याने त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कायदेशीर अडथळे दूर करून एसटी समाजाचे घटनात्मक आणि राजकीय अधिकार सुरक्षित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.