गोव्यातील एसटी बांधवांच्या राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार; अमित शाह यांच्याशी चर्चा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार आणि केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले. या मागणीच्या अनुषंगाने गोवा विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला असून, आरक्षणासंदर्भातील विधेयकही मंजूर करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने पुढील कायदेशीर पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच सर्वोच्च न्यायालयात अपील केले जाईल, असे सावंत यांनी नमूद केले.
2027 च्या निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्याचा विश्वास
केंद्र सरकारने एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्याबाबत घेतलेला निर्णय कायम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आगामी 2027 च्या निवडणुकीत गोव्यातील एसटी बांधवांना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी भाजपच्या वतीने आपण स्वतः केंद्र स्तरावर पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
एसटी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावे, ही सरकारची भूमिका असून, त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील अपील आणि त्यावरील पुढील निर्णयाकडे आता गोव्यातील एसटी समाजाचे लक्ष लागले आहे.
