एसटी राजकीय आरक्षण आणि धनगर समावेशाच्या मागण्यांमुळे केपेकडे सर्वांचे लक्ष
गोव्यातील एसटी समाजाला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटना आंदोलन आणि पाठपुरावा करीत आहेत. या मागणीसाठी अॅड. जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली 'मिशन रिझर्व्हेशन' ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून गोव्यातील एसटी समाजातील विविध संघटना 'युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्स' (UTAA) या संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन राजकीय आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. या संघटनेचे नेतृत्व माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप करीत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळणार की नाही, तसेच जनगणनेच्या आधारे किती विधानसभा मतदारसंघ आरक्षित होणार, याबाबत समाजात उत्सुकता आहे. या प्रश्नावर सरकारने दिलेली मुदत संपल्यानंतर UTAA ने पुढील आंदोलनात्मक रणनीती ठरविण्यासाठी 31 ऑक्टोबर रोजी मडगाव येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातील एसटी समाजाचे प्रतिनिधी, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होऊन पुढील दिशा निश्चित करणार आहेत.
चार मतदारसंघांच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अलीकडेच एसटी राजकीय आरक्षणाच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केपे, सांगे, नुवे आणि प्रियोळ या चार विधानसभा मतदारसंघांच्या आरक्षणासंदर्भात अहवाल पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्ये सार्वजनिक सुनावणीची प्रक्रिया होण्याची शक्यता असून, 10 डिसेंबरपूर्वी अंतिम अधिसूचना अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चार मतदारसंघांतील राजकीय समीकरणांकडे विशेष लक्ष लागले आहे.
धनगर समाजाच्या एसटी समावेशाचीही मागणी
दुसरीकडे, धनगर समाजाचा अनुसूचित जमातींच्या प्रवर्गात समावेश करावा, ही मागणीही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीचे नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर करीत आहेत. त्यामुळे एसटी राजकीय आरक्षणाबरोबरच धनगर समाजाच्या एसटी समावेशाचा मुद्दाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
या दोन्ही मागण्यांशी संबंधित नेतृत्व केपे मतदारसंघाशी जोडलेले असल्याने या भागातील राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मागण्यांवर सरकारची भूमिका, संघटनांची पुढील आंदोलने आणि स्थानिक राजकीय नेत्यांची भूमिका यावर आगामी काळातील राजकीय वातावरण अवलंबून राहणार आहे.
कुशावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम?
केपे हा कुशावती जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून, येथील राजकीय घडामोडींचे पडसाद जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्येही उमटू शकतात. कुशावती जिल्ह्यासह राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये एसटी समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे. त्यामुळे राजकीय आरक्षणाचा मुद्दा केवळ केपेपुरता मर्यादित न राहता राज्यव्यापी महत्त्वाचा ठरणार आहे.
कुशावती जिल्ह्यातील हिंदू एसटी समाजाचा भाजपला पूर्वीपासून पाठिंबा राहिला आहे. भाजप सरकारने एसटी समाजातील नेत्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. डॉ. गणेश गावकर यांना विधानसभा सभापतीपद, तर डॉ. रमेश तवडकर यांना मंत्रिपद आणि महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. असे असतानाही एसटी समाजाकडून राजकीय आरक्षणाची मागणी सातत्याने लावून धरली जात आहे.
आता 31 ऑक्टोबरच्या UTAA बैठकीत कोणती भूमिका घेतली जाते, आरक्षणाच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून पुढे कोणती पावले उचलली जातात आणि धनगर समाजाच्या मागणीवर काय घडामोडी होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केपे मतदारसंघातील या घडामोडी गोव्याच्या राजकारणाला कोणती दिशा देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
