गोव्याने जगाला शांततेचा संदेश द्यावा : सिल्वा
मडगाव : गोव्यात सद्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या संदर्भात प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने ख्रिस्ती समाजाने वेलिंगकर यांचा निषेध केला आहे. त्यांच्या विरोधात पोलीस तक्रारी नोंद केल्या आहेत. ते रस्त्यावर उतरले आहेत. याच पार्श्वभूमिवर सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जवळ येत असल्याने सर्वांनी शांतता राखावी व संपूर्ण जगाला शांततेचा संदेश द्यावा, असे आवाहन वेळळीचे आमदार व्रुझ सिल्वा यांनी केले आहे. आमदार व्रुझ सिल्वा यांच्या तक्रारीनंतरच पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंद केला. त्यानंतर त्यांच्या अटकेची मागणी करत ख्रिस्ती लोक रस्त्यावर उतरले. मडगावात सलग तीन दिवस आंदोलन छेडण्यात आले. तसेच वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज न्यायालयाने नाकारला. त्यामुळे हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या फेस्तात दर वर्षी सर्व धर्मातील लोक सहभागी होतात. हीच परंपरा कायम ठेऊन यंदाही सर्वांनी फेस्तात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार व्रुझ सिल्वा यांनी केले आहे.