For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधानांच्या ‘गॅरंटी’वर गोवा स्वयंपूर्ण

11:23 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधानांच्या ‘गॅरंटी’वर गोवा स्वयंपूर्ण
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास : राज्यपालांच्या अभिभाषणावर आभार दर्शक ठराव

Advertisement

पणजी : गोव्यासह देशाची रामराज्याकडे वाटचाल सुरू झाली असून सर्वांनी सहकार्य दिल्यास ‘विकसित भारत, विकसित गोवा 2047’ चा संकल्प व त्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्यासाठी ‘भिवपाची गरज ना’ असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी रात्री विधानसभेत बोलताना दिले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार दर्शक ठरावाच्या चर्चेचा समारोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, अंत्योदय, ग्रामोदय, सर्वोदय या तत्वांवर सरकार काम करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर गोवा स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न आहे. ते देखील साकारण्यात येईल. पुढील 25 वर्षांचा विचार करून केंद्रासह गोवा सरकारची आगेकूच सुरू आहे. डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून हा संकल्प पूर्ण करण्याची खात्री त्यांनी दिली.

कायदा-सुव्यवस्था बिघडली : आलेमाव

Advertisement

राज्यपालांच्या भाषणातून सरकारचे अपयश लपवण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपाल अभिभाषणावरील आभारदर्शक ठराव चर्चेच्यावेळी केली. प्रशासन पूर्णपणे कोसळले असून त्याचा अनुभव लोकांना येत आहे. गोवा राज्य ड्रग्समध्ये स्वयंपूर्ण झाल्याचा टोमणा आलेमाव यांनी सरकारला मारला असून कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोपही त्यांनी केला.

स्थानिक स्वराज संस्थांना अधिकार द्यावेत

जिल्हा पंचायत, ग्रामपंचायत यांना कोणतेच वाढीव अधिकार देण्यात आले नाहीत. गोवा हे भिकाऱ्यांचे घर झाले असून आपत्ती व्यवस्थापन असून नसल्यासारखेच असल्याचे त्यानी नमूद केले. कोकणी कवी मनोहर सरदेसाई यांची ‘जायात जागे’ ही कविता वाचून आलेमाव यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

सरकारचे अपयश टाळले : व्हिएगश

स्मार्ट सिटी म्हणून गाजावाजा करून पणजी शहराच्या झालेल्या दुर्दशेबाबत राज्यपालांच्या भाषणात अवाक्षर नसल्याची टीका आपचे आमदार व्हेंझी व्हिएगश यांनी केली. म्हादई, खाण उद्योग, व्याघ्र राखीवता क्षेत्र यावरही राज्यपालांच्या भाषणात कोणताही उल्लेख नसल्याचे व्हिएगश यांनी निदर्शनास आणले. सरकार अनेक बाबतीत अपयशी ठरले ते रज्यपालांच्या भाषणातून टाळण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्री भ्रष्टाचार करतो परंतू त्याबाबत राज्यपाल भाषणातून काहीच बोलत नाहीत, याकडेही व्हिएगश यांनी लक्ष वेधले.

खासगी क्षेत्रात परप्रांतीयांचा भरणा : सरदेसाई

आमदार विजय सरदेसाई यांनीही राज्यपालांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन सरकारवर ठपका ठेवला. गोवा राज्यात ‘गोयकार’ दिसत नाही, अशी परिस्थिती आहे. बेकारीवर राज्यपालांच्या भाषणात उल्लेखच नाही. खासगी क्षेत्रात तर गामंतकीयांना नोकऱ्याच नाहीत. तेथे तर सर्वत्र परप्रांतीयांचाच भरणा दिसून येतो. त्यावर राज्यपालांच्या भाषणात कोणताच आवाज नाही. तेथे किती गोमंतकीयांना नोकऱ्या मिळाल्या याचा साधा तपशीलही सरकारकडे नाही. गोव्यातील टपाल खात्यात तर सर्वजण गोव्याबाहेरचे ! पोस्टमनही बाहेरचे ! असेही त्यांनी निदर्शनास आणले.

मोन्सेरातांचे आश्वासन हवेतच : बोरकर

कॅसिनो पणजीतून स्थलांतरीत करण्याचे आश्वासन राज्य सरकारने अनेकदा दिले. शंभर दिवसात ते बाहेर काढतो, असे मोन्सेरात यांनी आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेतच विरले. गोवा संपवण्याचे कारस्थान चालू असल्याची टीका आमदार वीरेश बोरकर यांनी केली.

राज्याचा गुन्हेगारी शोध दर देशात सर्वोच्च

गोवा राज्याचा गुन्हेगारी शोध दर 85 टक्के असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला असून तो संपूर्ण देशात सर्वोच्च असल्याचे सांगितले. सरकार बँकींग व्यवहारासाठी पेटीएम वापरत नसल्याची माहिती त्यांनी दिली. बेतूल येथील उर्जा सप्ताह (इंडिया एनर्जी वीक) गोमंतकीय विद्यार्थीवर्ग, जनतेसाठी 9 फेब्रुवारी रोजी खुला ठेवण्यात येणार असून इंजिनियरींग विद्यार्थ्यांनी तेथे भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यावा आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख करुन घ्यावी, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले. गृहआधाराचे 1500 पेक्षा जास्त अर्ज मंजूर करण्यात आले असून इतर योजनांतील काही अर्जाना मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.