For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात टॅक्सी भाड्यात मोठा बदल; नवी भाडेरचना लागू, रात्रीच्या प्रवासासाठी 35 टक्के अतिरिक्त शुल्क

11:26 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात टॅक्सी भाड्यात मोठा बदल  नवी भाडेरचना लागू  रात्रीच्या प्रवासासाठी 35 टक्के अतिरिक्त शुल्क
Advertisement

पणजी : गोव्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी तसेच पर्यटक टॅक्सींच्या भाड्यात सुधारणा करण्यात आली असून, राज्य परिवहन प्राधिकरणाने नव्या दररचनेची अधिसूचना जारी केली आहे. या नव्या दरांमुळे वाहनाचा प्रकार, इंजिन क्षमता आणि प्रवासाचे अंतर यानुसार टॅक्सी भाडे निश्चित केले जाणार आहे. नवी रचना 5 ऑगस्ट 2021 रोजी निश्चित केलेल्या जुन्या दरांची जागा घेत आहे.

Advertisement

काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी नवे दर

नव्या दररचनेनुसार 998 ते 1499 CC क्षमतेच्या हॅचबॅक आणि सेडान श्रेणीतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी पहिल्या 3 किलोमीटरचे मूळ भाडे 300 रुपये, तर 3 ते 8 किलोमीटरसाठी 430 रुपये आकारले जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 26 रुपये हा दर लागू होईल.

1500 ते 2499 CC क्षमतेच्या नियमित एसयूव्हीसाठी पहिल्या 3 किलोमीटरचे भाडे 400 रुपये, 3 ते 8 किलोमीटरसाठी 560 रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 32 रुपये आकारले जातील. प्रीमियम एसयूव्ही/एमपीव्हीसाठी पहिल्या 3 किलोमीटरसाठी 500 रुपये आणि त्यानंतरच्या अंतरासाठी 32 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे.

Advertisement

पर्यटक आणि प्रीमियम कॅबसाठीही बदल

बीच परिसर आणि तारांकित हॉटेल्सशी संलग्न पर्यटक टॅक्सींसाठी स्वतंत्र दररचना करण्यात आली आहे. हॅचबॅकसाठी सुरुवातीचे भाडे 300 रुपयांपासून, नियमित एसयूव्हीसाठी 400 रुपये आणि प्रीमियम एसयूव्ही/एमपीव्हीसाठी 500 रुपयांपासून सुरू होते. मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी यांसारख्या प्रीमियम कॅबसाठी पहिल्या 3 किलोमीटरचे भाडे 1,000 रुपये असून त्यानंतर 149 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे.

रात्रीच्या प्रवासासाठी 35 टक्के अतिरिक्त शुल्क

नव्या अधिसूचनेनुसार रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत केलेल्या प्रवासासाठी नियमित भाड्यावर 35 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. टॅक्सी थांबवून ठेवण्याचे शुल्क 50 रुपये प्रति तास किंवा प्रत्येक 10 मिनिटांसाठी 4 रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीबाहेर एकेरी प्रवास केल्यास नियमित भाड्यावर 50 टक्के अतिरिक्त आकार लागू होईल.

पर्यटक टॅक्सींसाठी रात्रीच्या प्रवासाच्या कालावधीत 35 टक्के अधिभाराबरोबर काही श्रेणींमध्ये 100 रुपये प्रति तास अतिरिक्त ऑपरेशनल शुल्क लागू असल्याचेही नव्या दररचनेत नमूद करण्यात आले आहे.

वाहनात दरपत्रक लावणे बंधनकारक

प्रवाशांना भाड्याबाबत स्पष्ट माहिती मिळावी, यासाठी परवानाधारकांनी वाहनामध्ये अधिकृत भाडेदरपत्रक ठळकपणे लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. टोल, पार्किंग, फेरी शुल्क आणि लागू कर हे प्रवाशांना स्वतंत्रपणे भरावे लागतील.

नव्या भाडेरचनेचा गोव्यातील स्थानिक प्रवासी तसेच पर्यटन क्षेत्रावर थेट परिणाम होणार आहे. दरम्यान, टॅक्सी व्यवसायाचे नियमन आणि भाड्यात पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे. अॅप-आधारित टॅक्सी सेवेसंदर्भात टॅक्सी व्यावसायिकांची भूमिका आणि सरकारच्या नियमनाच्या प्रयत्नांबाबतही चर्चा सुरू आहे.

Advertisement
Tags :

.