गोव्यातील नोकरभरती घोटाळ्याची दिल्लीत चर्चा
भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्ट असल्याचा राष्ट्रीय काँग्रेसचा आरोप : उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी
पणजी : पैसे घेऊन नोकरी देण्याचे आमिष दाखवण्याचे प्रकार घडल्याचे समोर आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गोव्यात नोकरभरती घोटाळ्यावरून वातावरण तंग बनले आहे. खुद्द आता आमदार, भाजपच्या कार्यकर्त्यांवरच पोलिसांत तक्रारी दाखल होऊ लागल्याने भाजप सरकारला धारेवर धरण्याचे काम विरोधक करीत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी देशाच्या राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार सर्वाधिक भ्रष्ट सरकार असल्याची बोचरी टीका केली आहे.
राजधानी दिल्लीत गोव्यातील नोकरभरती घोटाळ्याची चर्चा होऊ लागल्याने हा विषय राष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. गोव्यात गाजत असलेल्या नोकऱ्या विक्री प्रकरणावरून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आलोक शर्मा, केंद्रीय समितीचे सदस्य तथा गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींद्वारे नोकरभरती घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोव्यातील नोकरभरती घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेल्या गोव्यातील काही नेत्यांची नावेही आलोक शर्मा, गिरीश चोडणकर यांनी घेतली आहेत. दरम्यान, दिल्ली येथे आता गोव्यातील नोकरभरती घोटाळा प्रकरणाची चर्चा होऊ लागल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या ठोस भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. नोकरभरती प्रकरणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या आवाहनानुसार, आता नोकरीसाठी पैसे दिलेल्या तक्रारीही वाढण्याची चिन्हे आहेत.