For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्रीय करातून गोव्याला अतिरिक्त 523 कोटी प्राप्त

12:54 PM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
केंद्रीय करातून गोव्याला अतिरिक्त 523 कोटी प्राप्त
Advertisement

मध्यमवर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन

Advertisement

पणजी : केंद्रीय करातून राज्याचा वाटा म्हणून गोव्याला अतिरिक्त 523 कोटी मिळाले आहेत. त्याशिवाय विशेष आर्थिक साहाय्य म्हणून यंदा राज्याला भांडवली गुंतवणुकीसाठी 1.5 लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. नुकताच सादर करण्यात आलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा खास करून मध्यमवर्गाला दिलासा देणारा तर आहेच, त्याशिवाय विविध पायाभूत सुविधांसह डिजिटल सुविधाही मजबूत करण्यावर भर देणारा अर्थसंकल्प आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, त्याचबरोबर सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करतो, असे ते म्हणाले. अर्थसंकल्पासंबंधी माहिती देण्यासाठी मंगळवारी सचिवालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर तसेच समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचीही त्यावेळी उपस्थिती होती.

कर रचनेत सुधारणा करून 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्ती तसेच टीडीएस आणि टीसीएसमध्ये समानता आणण्याचे निर्णय मध्यमवर्गाला दिलासा देणारे आहेत, असे सावंत म्हणाले. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय करांमध्ये राज्याचा वाटा रु. 5490 कोटी असेल. गत आर्थिक वर्षाच्या तुलनेत हा रु. 523 कोटी एवढा जादा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जलजीवन मिशनचा विस्तार केल्यामुळे गोव्यात जलपुरवठा सुधारण्यात मदत होईल, इलेक्ट्रिक वाहने, जहाज उद्योग, मासे प्रक्रिया आदी उद्योगांसाठी जकात कर घटविल्यामुळे विविध उद्योगांना मदत मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्याला लॉजिस्टिक हब बनविण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू असतानाच केंद्रीय अर्थसंकल्पात एअर कार्गोसाठी साहाय्य योजना जाहीर केल्यामुळे हे प्रयत्न यशस्वी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Advertisement

यंदा आयआयटीची पायाभरणी

दरम्यान, एका प्रश्नावर बोलताना त्यांनी, राज्यात आयआयटी संकुलासाठी जागा लवकरच निश्चित करण्यात येईल व शक्यतो याच वर्षी त्याची पायाभरणीही करण्यात येईल, असे सांगितले. पेडणे ते काणकोणपर्यंत स्थानिकांसाठी रेल्वे सेवा येत्या 2 ते 3 वर्षात सुरू करण्यात येईल. ही रेल्वे सुरू झाल्यानंतर उत्तर आणि दक्षिण गोवा एकमेकाशी जोडला जाईल. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीचा ताण कित्येक पटीने कमी होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मये, नेवरा, सां जुझे आरियल भागात नवीन रेल्वे स्थानके

या व्यतिरिक्त कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेसाठी गोव्याला 482 कोटी ऊपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दुहेरी ट्रकिंगची कामे पूर्ण होतील. तसेच मये, नेवरा आणि सां जुझे दी आरियल या भागात नवीन रेल्वे स्थानके बांधण्यात येतील, अशी माहिती सावंत यांनी दिली.

Advertisement
Tags :

.