For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कमी प्लास्टिक वापरात गोवा तिसऱ्या स्थानी

12:40 PM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
कमी प्लास्टिक वापरात गोवा तिसऱ्या स्थानी
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : राजभवनात पर्यावरणदिन उत्साहात साजरा

Advertisement

पणजी : देशात गोवा राज्य हे अगदी कमी प्लास्टिक वापराबाबत आदर्श उदाहरण ठरत आहे. कारण प्लास्टिक कमी वापरात देशात गोव्याचा तिसरा क्रमांक आहे. आधुनिक सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांट यांसह आम्ही टाकाऊ कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करत आहोत. शून्य कचरा गोवा बनवण्याच्या दिशेने आमचे काम सुरू आहे. याशिवाय खाजन आणि खारफुटीचे पुनऊज्जीवन करणे, पर्यावरणपूरक गोष्टींना प्रोत्साहन आणि कृषी-पर्यावरणीय धोरणांवरील उपक्रम राबविणे हा सरकारचा अजेंडा आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

दोनापावला राजभवन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यावरण सचिव अऊण कुमार मिश्रा, पर्यावरण खात्याचे संचालक सचिन देसाई, पद्मश्री प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे व गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, जागतिक पर्यावरणदिनी पद्मश्री डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ या उद्दिष्ट्याने आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची आहे, ही भावना जागृत ठेवून प्रत्येकाने जागृत रहावे.

Advertisement

शाश्वत पर्यावरणीय प्रशासन

गोवा राज्य जैवविविधता मंडळाने अथक परिश्रम घेऊन पर्यावरणीय वार्षिक अहवाल, खाजन जमीन व्यवस्थापन योजना आराखडा, खारफुटी व्यवस्थापन योजना आणि धूप अभ्यासावरील राष्ट्रीय कार्यशाळा अहवाल बनविला आहे. या सर्व कागदपत्रांचे अनावरण झाले असून, जीसीझेडएमए आणि डीओईसीसी हे पोर्टल सुरू करून पारदर्शकता आणि शाश्वत पर्यावरणीय प्रशासनासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांमुळे स्वच्छता जागृती

पर्यावरण हितासाठी सामूहिक जबाबदारीतून कार्य होणे गरजेचे आहे. सकारात्मक भावनेने केलेले कार्य हे राज्याच्या विकासात भर घालतेच शिवाय पर्यावरणाचेही रक्षण करते. या कार्यात सरकारबरोबरच स्थानिक लोकांनीही अधिक मदत करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा आपल्या हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छतेला प्राधान्य देत स्वत: याकामी हातात झाडू घेऊन स्वत: स्वच्छता करून स्वच्छतेबाबतचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच आज स्वच्छतेच्याबाबतीत सर्वांमध्ये जागृती वाढीस लागली आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमात पद्मश्री प्रकाश आमटे, मॅगासेस पदक विजेत्या मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसा येथे कुष्ठरोगी बांधवांसाठी केलेल्या कार्याबद्दल गोवा राज्याच्या वतीने आमटे दाम्प्त्यांचा गोव्याची पारंपरिक कुणबी शाल, श्रीफळ आणि रोपटे देऊन गौरव केला.

Advertisement
Tags :

.