‘गुंतवणूक स्नेही’ राज्यांत गोवा चौथ्या स्थानी
नीती आयोगाच्या निर्देशांकातून स्पष्ट
प्रतिनिधी/ पणजी
नीती आयोगाच्या यंदाच्या ‘गुंतवणूक-स्नेही’ निर्देशांकामध्ये गोव्याने चौथे स्थान पटकावले आहे. एकूण 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गोव्याने 53.1 गुण प्राप्त केले आहेत. तर सात ‘शहर-राज्ये’ आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटात गोव्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी 50 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या देशातील केवळ पाच राज्यांमध्ये गोव्याला हे स्थान मिळाले आहे.
उपलब्ध पायाभूत सुविधा, व्यवसायासाठी अनुकूल तथा संस्थात्मक वातावरण, संसाधने, नियमन विषयक सुलभता, आर्थिक स्थिती, सरकारी धोरणे आणि पर्यावरणीय लवचिकता यासारख्या निकषांच्या आधारे गुंतवणूक परिसंस्थेची क्षमता आणि सज्जता यांचे मूल्यमापन करण्यात आले होते.
आपल्या श्रेणीतील राज्यांच्या तुलनेत, गोव्याने कौशल्य विकास आणि आरोग्यसेवा यांच्या टक्केवारीनुसार सर्वाधिक खर्च केला आहे. राज्यातील उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास 25 टक्के विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या अभ्यासक्रमांची निवड करतात. या क्षेणीत गोव्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
भारताच्या एकूण हवाई वाहतुकीत गोव्याचा वाटा सुमारे 0.35 टक्के असूनही, देशाच्या एकूण विमानतळ क्षमतेपैकी जवळपास 3 टक्के क्षमता गोव्यातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांमुळे उपलब्ध होते. बंदरांच्या क्षमतेचा विचार करता राज्याचा वाटा राष्ट्रीय एकूण क्षमतेच्या सुमारे 3 टक्के इतका आहे.
पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, कुशल मनुष्यबळ, नियामक कार्यक्षमता, संपर्क-सुविधा आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांतील प्रयत्नांचेच हे यश द्योतक आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे. या यशाच्या आधारे जबाबदार गुंतवणूक आकर्षित करणे, दर्जेदार रोजगार निर्माण करणे आणि गोव्यातील तऊणांसाठी अधिक संधी उपलब्ध करून देणे या दिशेने गोवा वाटचाल करेल, असेही सरकारने नमूद केले आहे.