For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्य सुविधांमध्ये गोवा अव्वल... पण...

06:27 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
आरोग्य सुविधांमध्ये गोवा अव्वल    पण
Advertisement

गोवा आरोग्य सुविधांमध्ये इतर अनेक राज्यांपेक्षा पुढे आहे, यात कोणतेच दुमत नसावे. गोव्यात बहुतेक सर्वच तालुक्यात सरकारने चांगल्या दर्जाची रुग्णालये निर्माण केली आहेत मात्र ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाहीत. याचा थेट परिणाम हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर होत असतो. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Advertisement

आरोग्य सुविधेचा विचार करुन गोवा राज्यात काणकोणपासून पेडण्यापर्यंत सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णालये निर्माण केलेली आहेत. यातील बऱ्याच रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधाही उपलब्ध झालेल्या आहेत पण दुर्दैवाची बाब म्हणजे ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली नाहीत. त्यामुळे काणकोणच्या असो किंवा पेडणेतील रुग्णांना ‘गोमेकॉ’त पाठविले जात आहे. यात फरफट होतेय ती रुग्णांची. बऱ्याचवेळा रुग्ण वाटेत दगावण्याचे प्रकारही घडतात. याचा गांभिर्याने सरकारने विचार करण्याची गरज आहे.

सरकारने, विशेष करून आरोग्य खात्याने कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेले तज्ञ डॉक्टर, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांची सोय केली तर गोमेकॉत रुग्ण पाठविण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटू शकते. जर एखादा रुग्ण गंभीर आजारी असेल आणि स्थानिक रुग्णालयात त्याच्यावर उपचार होऊ शकत नसेल तर त्याला ‘गोमेकॉ’त पाठविणे समजू शकते मात्र आता अशी परिस्थिती आहे की, सरकारच्या बऱ्याच रुग्णालयांमध्ये पाहायला गेल्यास तज्ञ डॉक्टरांची, परिचारिकांची तसेच इतर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच आवश्यक साधन सामुग्रीची देखील कमतरता जाणवते आहे. त्यामुळे दक्षिण व उत्तर गोव्यातील रुग्णांना अगोदर दोन्ही जिल्हा इस्पितळांमध्ये पाठवले जाते व तेथून पुढे बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेले जाते. स्थानिक पातळीवर भव्य अशी रुग्णालये आहेत मात्र येथील गरजा पूर्ण करण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचा मानसिक त्रास रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनादेखील नाईलाजाने सहन करावा लागतोय. याच्यासारखे दुर्देव कोणते असावे.

Advertisement

अन्य राज्यांमध्ये सरकारी पातळीवर अशा चांगल्या सुविधा उपलब्ध होत नाहीत. म्हणूनच शेजारील राज्यांतून रुग्ण उपचारासाठी गोव्यात येतात. त्याचा ताणही ‘गोमेकॉ’वर सातत्याने येतो. ‘गोमेकॉ’त उत्तम डॉक्टर, परिचारिका, खाटांचे जास्त प्रमाण, सरकारी आरोग्य योजना (दिनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना) आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी आहे, ज्यामुळे प्राथमिक ते तृतीय स्तरापर्यंतच्या आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. असे असले तरी, वाढत्या लोकसंख्येमुळे इतर शहरी भागांमध्येही सुविधा उपलब्ध होण्याची नितांत गरज आहे.

गोव्यात उत्तम पायाभूत सुविधा आहेत. ज्यात सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील एकूण 4600 खाटांसह 120 हून अधिक ऊग्णालये आहेत. अन्य राज्यांमध्ये पाहायला गेल्यास अशी वैद्यकीय सुविधा आढळून येत नाही. आरोग्य योजनेत ‘दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना’सारख्या सार्वत्रिक विमा योजना आणि सुपरस्पेशालिटी उपचारांसाठी ‘गोवा मेडिक्लेम’ आणि ‘गोवा स्टेट इलनेस असिस्टन्स सोसायटी’ अंतर्गत रुग्णांना आर्थिक मदत मिळते. अशा योजना इतर राज्यांमध्ये उपलब्ध नाहीत.

वैद्यकीय सुविधांमुळे गोव्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. ‘सीएसई’ (ण्ए)िंच्या अहवालानुसार, आरोग्य आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये गोवा देशात अव्वल आहे. आता सरकारने दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा रुग्णांलयातील कमतरता दूर करणे आवश्यक आहे. फोंडा तालुक्यातील ‘आयडी’ हॉस्पिटलकडे देखील तेवढेच लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी रक्तपेढी व इतर सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. प्रगत सेवा: गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया आणि उत्कृष्टता केंद्रे (णहे द xिंमत्तहम) सुरू होत आहेत, ज्यामुळे आरोग्य सेवा अधिक प्रगत होत आहेत. आता अशा सुविधाही काळाची गरज बनली आहे.

वाढत्या स्थलांतरित लोकसंख्येमुळे, विशेषत: शहरी भागांमध्ये, आरोग्य सुविधांवर ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा अधिक प्रभावी करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास ‘गोमेकॉ’वर सातत्याने पडणारा ताण खूप अंशी कमी होईल. आज ‘गोमेकॉ’त डॉक्टरांना भेटायचे झाल्यास रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना भल्या पहाटे उठून, ‘गोमेकॉ’त जाऊन क्रमांक मिळवावा लागतो. या अशा प्रकारात बदल होणे आवश्यक बनले आहे. दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यांचा म्हणावा तसा वापर होत नसल्याचे सांगितले जाते कारण तज्ञ डॉक्टरांचा अभाव तसेच आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही.

सकाळच्या सत्रात ‘बाह्या रुग्ण विभागात’ रुग्णांची जी गर्दी उसळते, ती पाहिल्यास दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा इस्पितळे किती महत्त्वाची कामगिरी करतात, हे स्पष्ट होत आहे. काणकोण, कुडचडे, सांगे, वास्को, फोंडा, वाळपई, डिचोली, पेडणे इत्यादी ठिकाणी असलेल्या सरकारी रुग्णालयांचा दर्जा सुधारला व आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या तर दक्षिण व उत्तर गोवा जिल्हा इस्पितळांवरील तसेच ‘गोमेकॉ’वरीलही ताण कमी होण्यास बरीच मदत होऊ शकते. गोवा आरोग्य सुविधांच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा सरस आहे पण लोकसंख्या वाढीच्या अनुषंगाने सेवांचा विस्तार करणे आवश्यक आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने सरकारला ते शक्य आहे.

महेश कोनेकर

Advertisement
Tags :

.