गोवा राखण यात्रेत महाराष्ट्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सहभाग; पत्रादेवीतून प्रचाराला सुरुवात
ओटवणे : गोव्याची जमीन, पर्यावरण, संस्कृती आणि स्थानिक अस्मितेच्या रक्षणासाठी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘गोवा राखण यात्रे’ला महाराष्ट्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही उपस्थिती लावली. शनिवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या उपस्थितीत पेडणे येथे यात्रेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पेडणे येथील ग्रामदैवत भगवतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यात आला. त्यानंतर पत्रादेवी येथे गोवा स्वातंत्र्य संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी मोनिका जगताप, तुकाराम कदम, उज्वला साळवे, महेश भणगे, अॅड. समीर वंजारी, अॅड. जितेंद्र गावकर, मिलिंद माटे, बालाजी सावळे, सुनील पारकर, संतोष पाटील, फजील शेख, प्रतीक यादव, प्रल्हाद गायकवाड, विजय पाटील, विनोद पाटील, कुणाल शेळके आणि संदीप तिवारी आदी उपस्थित होते.
22 सप्टेंबर रोजी पणजी येथून या यात्रेला सुरुवात झाली असून 18 ऑक्टोबरपर्यंत गोव्यातील सर्व 40 विधानसभा मतदारसंघांमधून सुमारे 355 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. गोव्यातील जमिनींचे कथित अनधिकृत रूपांतरण, पर्यावरणाचा ऱ्हास तसेच स्थानिक तरुणांच्या रोजगारावर परिणाम करणाऱ्या निर्णयांविरोधात जनजागृती करणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.