गोवा पोलिसांना राष्ट्रीयस्तरावर मान्यता
‘इंडिया सायबर कॉप ऑफ द इयर 2025’ व क्षमता बांधणी श्रेणीतील पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी/ पणजी
गोवा पोलिसांना डीएससीआय (डेटा सिक्युरिटी कौन्सिल ऑफ इंडिया)ने राष्ट्रीयस्तरावर मान्यता दिली व राष्ट्रीयस्तरावर अभिमानाने सन्मानित करण्यात आले. सायबर गुन्हा विरोधी विभागाचे निरीक्षक दीपक पेडणेकर यांना शुक्रवारी 5 डिसेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या डीएससीआय उत्कृष्टता पुरस्कार समारंभात प्रतिष्ठित डीएससीआय ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द इयर 2025’ पुरस्कार आणि क्षमता बांधणी श्रेणीतील पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी नेटवर्कमध्ये व्यत्यय आणणे आणि या वर्षीच्या सुऊवातीला नुलाक्सी तलानीती नावाच्या चिनी वंशाच्या नागरिकाला अटक करणे यासारख्या प्रमुख सायबर गुह्यांच्या प्रकरणांच्या तपासासाठी निरीक्षक दीपक पेडणेकर यांना ‘सायबर कॉप ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सायबर गुन्हा विरोधी विभाग रायबंदर यांना कायदा अंमलबजावणी संस्थांच्या क्षमता बांधणी श्रेणीतील उत्कृष्टतेमध्ये अंतिम पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांना हा पुरस्कार मिळविण्यासाठी नामांकित करण्यात आले होते, त्यांच्यावतीने निरीक्षक दीपक पेडणेकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
सायबर गुन्हे तपास, जागृतीत प्रगती
गेल्या दीड वर्षांत गोवा पोलिसांच्या सायबर तपास क्षमतांमध्ये झालेल्या लक्षणीय प्रगतीमुळे ही मान्यता मिळाली आहे. गेल्या दीड वर्षांत सायबर गुन्हे कमी व्हावेत यासाठी सायबर तपासाबाबत सुमारे एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील सर्व पोलिस स्थानकात सायबर गुन्हे प्रतिसाद कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जागरुकतेसाठी स्वयंसेवक नेटवर्कसह सायबरयोद्धा उपक्रम राबविण्यात आला आहे. सामान्य जनतेसाठी सायबर जागरुकता प्रशिक्षण देण्यात आले. या सारखे विविध उपाययोजना आखून सायबर गुन्हे कमी करण्यात प्रयत्न केला आहे.
भारतातील डेटा सुरक्षा परिषद (डीएससीआय) ही भारतातील डेटा संरक्षण, सायबर सुरक्षा आणि गोपनियतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन केलेली एक प्रमुख उद्योग संस्था आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी सरकार, उद्योग आणि कायदा अंमलबजावणी काम करते. डीएससीआय संस्थांसाठी सर्वोत्तम-सराव चौकट, धोरण शिफारसी आणि क्षमता-निर्माण कार्यक्रम विकसित करते. डीएससीआय उत्कृष्टता पुरस्कारांसारख्या उपक्रमांद्वारे सायबर सुरक्षेतील उत्कृष्टतेला देखील मान्यता देते. हा पुरस्कार गोवा पोलिस महासंचालक आलोक कुमार (आयपीएस) आणि अधीक्षक सायबर क्राइम राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या नेतृत्वाखाली गोवा पोलिसांना कामगिरीबद्दल मिळाला आहे.