For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पंचायती, पालिका न्यायालयाच्या रडारवर; भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थेसंदर्भात फटकारले

09:04 AM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंचायती  पालिका न्यायालयाच्या रडारवर  भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थेसंदर्भात फटकारले
Advertisement

पणजी : उच्च न्यायालयाने गोव्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन आणि त्यांची गणना करण्याबाबतच्या न्यायालयीन निर्देशांचे पालन करण्यात दाखवलेल्या उदासीन दृष्टिकोनाबद्दल आणि सततच्या विलंबामुळे कडक शब्दांत फटकारले आहे.

Advertisement

न्यायालयाने आदेश दिले आहेत की, जर संबंधित ग्रामपंचायतींचे सचिव, नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी आणि पणजी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी दिवसभरात न्यायालयाच्या नोंदणी विभागात अनुपालन प्रतिज्ञापत्रे दाखल केली नाहीत, तर पंचायत संचालक आणि नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला आहे.

कठोर कारवाईचा इशारा
एका सु मोटो दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सोमवारी उच्च न्यायालयाने नगरपालिकांच्या मुख्य अधिकारी आणि ग्रामपंचायतींचे सचिव यांना इशारा दिला की, जर न्यायालयाच्या आदेशांचे त्वरित पालन केले नाही, तर त्यांच्या विरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कार्यवाही केली जाईल.

Advertisement

अनुपालन प्रतिज्ञापत्रांबाबत उदासीनता
याआधी, ६ ऑक्टोबर रोजी स्पष्ट निर्देश देऊनही, अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळेवर आपली प्रतिज्ञापत्रे आणि सार्वजनिक नोटीसचे रेकॉर्ड दाखल केले नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले, तेव्हा न्यायालयाला सांगण्यात आले की, केवळ काही नगरपालिका परिषदांनीच सुरुवातीला आपली अनुपालन प्रतिज्ञापत्रे दाखल केली होती. सांगे, कुडचडे - काकोडा, कुंकळ्ळी आणि मडगाव नगरपालिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांनी सुनावणीदरम्यान घाईघाईने आपली उत्तरे सादर करण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या दिवसाभरात सर्व कागदपत्रे दाखल करण्याचे आश्वासन दिले.

प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई
उच्च न्यायालयाने नोंदवले की, प्रशासकीय शिस्तभंगाची कारवाई सुरू केली जाईल. मात्र याचा अर्थ असा नाही की उच्च न्यायालय 'न्यायालय अवमान कायद्या अंतर्गत स्वतंत्र कार्यवाही करू शकत नाही. तयारीच्या अभावाबद्दल नाराजी व्यक्त करत, खंडपीठाने टिप्पणी केली की, प्रशासकीय अधिकारी न्यायालयीन आदेशांबाबत आणि सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केलेल्या तातडीच्या बाबींबाबत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसते. उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, 'हे निर्देश खूप आधी देण्यात आले होते. आम्हाला असे दिसून येते की, हे मुख्य अधिकारी या विषयाकडे अत्यंत हलक्या नजरेने पाहत आहेत. ते न्यायालयाच्या आदेशांचे पालनच करत नाहीत.' न्यायालयाने असा प्रश्नही उपस्थित केला की, त्यांच्या अधिकृत सेवा नोंदींमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल नोंदी का केल्या जाऊ नयेत? भटक्या कुत्र्यांच्या सर्वेक्षणाबाबत माहिती देताना न्यायालयाने नमूद केले की, सर्व नगरपालिका परिषदा भटक्या कुत्र्यांच्या सर्वेक्षणाचे अहवाल 'पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालया कडे सादर केले आहेत, परंतु अनेक ग्रामपंचायतींनी असे अहवाल सादर केलेले नाहीत.

कुडका येथे प्राणी निवारा केंद्रासाठी तांत्रिक मंजुरी
सुनावणीदरम्यान कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे उभारण्याबाबतही चर्चा करण्यात आली. न्यायालयाला माहिती देण्यात आली की, टीसीपी खात्याने १५ ऑक्टोबर रोजी पणजी महानगरपालिकेद्वारे कुडका येथे प्रस्तावित केलेल्या प्राणी निवारा केंद्रासाठी तांत्रिक मंजुरी दिली आहे. या तांत्रिक मंजुरीनंतर, १६ ऑक्टोबर रोजी कुडका-बांबोळी तळावली ग्रामपंचायतीकडे बांधकाम परवान्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. ग्रामपंचायत सचिव न्यायालयात उपस्थित नसल्याचे लक्षात घेऊन, न्यायालयाने ग्रामपंचायतीला निर्देश दिले की, या प्रकरणाचे गांभीर्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करता, बांधकाम परवान्याचा प्रस्ताव त्वरित विचारात घेण्यासाठी तो आगामी नियोजित बैठकीच्या किंवा एका आठवड्याच्या आत बोलावल्या जाणाऱ्या विशेष बैठकीच्या कार्यसूचीमध्ये समाविष्ट करावा.

Advertisement
Tags :

.