मांडवीतील कॅसिनो जहाज प्रकरणी सरकारला अखेरची संधी; 29 सप्टेंबरला अंतिम सुनावणी
पणजी : मांडवी नदीतील विद्यमान ऑफशोअर कॅसिनो जहाजाच्या जागी अधिक क्षमतेचे नवीन जहाज आणण्याच्या प्रस्तावाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अंतिम संधी दिली आहे.
‘एनफ इज एनफ’ या याचिकाकर्त्यांनी मांडवी नदीत नवीन कॅसिनो जहाज आणण्याच्या आणि त्याच्या संचालनाला परवानगी देण्याच्या प्रस्तावाला आव्हान दिले आहे. सुनावणीदरम्यान सरकारकडून अद्याप या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.
यानंतर न्यायालयाने सरकारला आपली भूमिका स्पष्ट करणारे आवश्यक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची अंतिम संधी दिली. त्यामुळे आता सरकारच्या प्रतिज्ञापत्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या याचिकेवर 29 सप्टेंबर 2026 रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावेळी अधिक क्षमतेच्या नवीन कॅसिनो जहाजाच्या प्रस्तावाबाबत याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर न्यायालयात पुढील सुनावणी होईल.
दरम्यान, याच कॅसिनो जहाजासंदर्भातील यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने आवश्यक प्रमाणपत्रे आणि परवानग्या प्राप्त केल्याशिवाय नवीन जहाजाला मांडवी नदीत संचालन करता येणार नसल्याचे निर्देश दिले होते.
ऑगस्टमध्ये संबंधित कॅसिनो कंपनीने राज्य सरकारकडून जहाजाचा परवाना नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 सप्टेंबरला निश्चित करण्यात आली होती.
आता सरकार प्रतिज्ञापत्रातून नवीन कॅसिनो जहाजाच्या प्रस्तावाबाबत नेमकी कोणती भूमिका मांडते आणि न्यायालय त्यावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.