For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्यात कृषी-पर्यटनाची योग्य सांगड हवी

12:49 PM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोव्यात कृषी पर्यटनाची योग्य सांगड हवी
Advertisement

कृषी विकासातील तज्ञ विलास शिंदे यांचे प्रतिपादन : ‘लोकमान्य’ सोसायटीतर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शनसत्र

Advertisement

पणजी : गोवा हे आरोग्य व शिक्षणात अग्रेसर असलेले राज्य असले, तरी कृषी क्षेत्राचा अभाव हा चिंतेचा विषय आहे. गोव्यातील जमिनींच्या वाढत्या किमतीमुळे शेती करणे कठीण झाले आहे. परिणामी, गोव्यातील 90 टक्के लोक सेवा क्षेत्राकडे वळले आहेत. पारंपरिक शेती व्यवसाय लोप पावत चालला आहे, ही खंत आहे. मात्र, कृषी व पर्यटन यांची सांगड घालून एक वेगळे मॉडेल तयार केल्यास गोव्यात शेतीला पुन्हा बहर येऊ शकतो, असा विश्वास नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन सेमिनारमध्ये शिंदे बोलत होते. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन, तरुण भारत समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला किरण ठाकुर, दै. तरुण भारतच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी, प्रीतम बिजलानी यांचीही उपस्थिती होती.

 शेतीला व्यवसायाची दिशा हवी

Advertisement

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, देश वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, परंतु अजूनही सुमारे 50 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यापैकी तब्बल 90 टक्के शेतकरी लघू व सीमांत शेती करत असून अनेकदा त्यांना तोट्याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत ’विकसित भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी ग्रामीण आणि शेतीप्रधान घटकांचा सर्वांगीण विकास अनिवार्य ठरतो. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पद्धतींपलीकडे पाहून स्वत:च्या क्षमतेची आणि ज्ञानाची नव्याने जाणीव करून घेणे गरजेचे आहे. शेती ही फक्त पोट भरण्यापुरती मर्यादित न राहता, ती आता ‘अग्री-फूड बिझनेस’ म्हणून विकसित होत आहे. जागतिक बाजारपेठेचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यावर भर द्यायला हवा. व्यवसायासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे, सहकार्याची भावना जोपासावी आणि सामूहिक शक्तीचा उपयोग करावा. सध्या अनेक शेतकरी संस्था अस्तित्वात आहेत, परंतु, त्या शेतकऱ्यांच्या खऱ्या अडचणींना हात घालताना कमी पडतात. त्यामुळे अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक संघटनांची गरज भासते. ग्रामीण भागातील आर्थिक साखळी सक्षम करणे ही काळाची गरज आहे. सुविधा निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर होत असलेले शहरांकडे स्थलांतर थांबेल आणि ग्रामीण जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.

शेतीकडे व्यवसायिक दृष्टिकोनातून पाहणे ही काळाची गरज आहे. कोणावरही अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान आता ‘गेम चेंजर’ म्हणून पुढे येत आहे. त्याचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांनी स्वत:चा ब्रँड तयार करावा. ग्राहकाच्या गरजा लक्षात घेऊन बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवे प्रयोग, नवीन तंत्रज्ञान, दर्जा आणि मूल्यवर्धन यावर भर देणे अत्यावश्यक आहे, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या शेवटी विविध शेतकरी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले अनुभव कथन केले. वास्तव आणि अडचणी मांडल्या. या संवादात त्यांनी बाजारपेठेतील अनिश्चितता, उत्पादन खर्च वाढ, तसेच सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांसारख्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांच्या या समस्या ऐकत विलास शिंदे यांनी समाधानकारक मार्गदर्शन केले आणि शक्मय त्या उपाययोजना सुचवून त्यांना दिशा दिली. या खुल्या संवादातून शेतकरी वर्गाला नव्या आशा आणि मार्गदर्शन मिळाले.

गोव्यात शेतीला हवी नवी दिशा : सई ठाकुर -बिजलानी

शेती हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सध्या नव्या तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक तऊण शेतीकडे वळत आहेत, आणि आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा नवा प्रवाह तयार होत आहे. मात्र गोव्यात शेतीला अजूनही प्राधान्य दिले जात नाही, जे खरोखरच चिंताजनक आहे. शेतीला आवश्यक तेवढे महत्त्व दिले गेल्यास, अनेक गोष्टी इतर राज्यातून आणण्याची गरज भासणार नाही. म्हणूनच, गोव्यातील शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि त्यात गुंतवणूक वाढविणे ही काळाची गरज आहे, असे सई ठाकुर -बिजलानी म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे संस्थापक चेअरमन आणि दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू भिकारो नाईक यांनी केले.

शेतीत प्रगती हाच भारताच्या सामर्थ्याचा पाया : किरण ठाकुर

भारतातील शेतीक्षेत्र इतके विशाल आहे की योग्य नियोजन आणि प्रयत्नांद्वारे आपण चीनसारख्या देशांशीही स्पर्धा करू शकतो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीने नव्हे, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेतात मेहनत घेणे गरजेचे आहे. सरकारनेही अनेक योजना आणि अनुदानाच्या स्वरूपात साहाय्य उपलब्ध करून दिले आहे, त्यांचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे. या सगळ्या अनुषंगाने गोव्यातील शेतीही टिकवणे आणि बळकट करणे आवश्यक आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांसाठीही शेती हा एक शाश्वत व्यवसाय ठरू शकेल, असे किरण ठाकुर यावेळी म्हणाले.

Advertisement
Tags :

.